Crime News: 2008 मध्ये प्रदर्शित झालेला Oye Lucky Lucky Oye हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? अभय देओल (Abhay Deol) मुख्य भूमिकेत असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच चालला होता. या चित्रपटात अभय देओलने चोराची भूमिका निभावली होती. अभय देओलची ही भूमिका एका खऱ्या चोराच्या आयुष्यावर आधारित होती. देविंदर सिंग (Devinder Singh) उर्फ बंटी (Bunty Chor) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हाय-टेक चोराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
देविंदर सिंग उर्फ बंटी याला बंटी चोर किंवा सुपर चोर अशा नावानेही ओळखलं जातं. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी चोराने नुकतंच राजधानी दिल्लीमधील हायप्रोफाइल वस्त्यांमध्ये चोरी केली आहे. दक्षिण दिल्लीमधील ग्रेटर कैलाश परिसरातील दोन घरातून त्याने लाखोंचं सामान चोरलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.
सुपर चोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविंदर सिंगने 2012 मध्ये तब्बल 500 चोऱ्या केल्या होत्या. 2008 मध्ये त्याच्या आयुष्यावर आधारित Oye Lucky Lucky Oye हा चित्रपटही बनवण्यात आला होता. काही वर्षांनी कलर्स चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वातही तो सहभागी झाला होता.
बंटी याचं शिक्षण पूर्ण झालेलं नसून अर्ध्यातच शिक्षण सोडलं होतं. लाखोंची चोरी करणाऱ्या बंटीने कधीही संपत्ती विकत घेतलेली नाही. याउलट तो नेहमी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचा.