आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात 'असं' पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक

Farmers Become Crorepati: शितल सिंग ही आपली औषधे घेण्यासाठी तालुक्याला गेले होते. यावेळी त्यांनी सहज गंमत म्हणून लॉटरी काढली होती. पण याचा निकाल लागल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Nov 8, 2023, 07:21 AM IST
आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात 'असं' पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक title=

Farmers Become Crorepati: शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात पण त्यालाच आयुष्यभर शेतात घाम गाळावा लागतो. कधी पावसाची दडी तर कधी पिकाल हमीभाव कमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी सतत चिंतेत असतो. असाच एक शेतकरी आयुष्यभर शेतात राबला. पण आता वयाच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्याच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे तो करोडपती झाला. या शेतकऱ्याच्या आयुष्यात नक्की काय घडलं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

पंजाबच्या होशियारपूर अंतर्गत येणाऱ्या माहिलपूर येथील एक वृद्ध शेतकरी गावात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण आपले संपूर्ण आयुष्य त्याने शेतात घालवले. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात घर चालवले आणि यातच तो आयुष्यभर समाधानी राहिला. पण आता वयाच्या साठीत आल्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून गेले आहे. तो अवघ्या चार तासात करोडपती झाला. शितल सिंग असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.

शितल सिंग ही आपली औषधे घेण्यासाठी तालुक्याला गेले होते. यावेळी त्यांनी सहज गंमत म्हणून लॉटरी काढली होती. पण याचा निकाल लागल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेतकरी शितल सिंग यांना अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. लॉटरीचा निकाल आल्यावर लॉटरी विक्रेते एसके अग्रवाल यांनी त्यांना फोनवरून माहिती दिली.

आता शितल सिंग यांच्या घरी आनंदाचे वातावरण असून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. 4 नोव्हेंबर रोजी होशियारपूर येथे औषध घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा कोर्ट रोडवरील ग्रीन व्ह्यू पार्कच्या बाहेरील एका स्टॉलवरून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते, असे शितल सिंग सर्वांना सांगतात. पण अवघ्या चार तासांतच मला बंपर बक्षीस मिळाले. लॉटरी स्टॉल मालकाने त्यांना फोनवरून ही माहिती दिल्याचेही ते आनंदाने सांगतात. 

वयोवृद्ध शीतल सिंग या व्यवसायाने शेतकरी असून अनेक दशकांपासून शेती करत आहेत. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नावर त्यांनी मुलांना शिकवले. त्यांची लग्न लावून दिली. प्रत्येकजण विवाहित असून ती परदेशात राहतात. आता शितल सिंग हे निवृत्तीचे आयुष्य जगत आहेत. एक ना एक दिवस देव आपल्याला संधी देईल, असा विश्वास होता असेही ते सांगतात. मिळालेली रक्कम कुटुंबाशी सल्लामसलत करुन वापरणार असल्याचेही ते सांगतात.

स्टॉल मालक एसके अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण  गेल्या 20 वर्षांपासून लॉटरी विकत आहोत. याआधी माझे वडील लॉटरी विकायचे. आमच्या स्टॉलवरून विकल्या गेलेल्या तिकिटाने तिसऱ्यांदा कोटींचे बंपर बक्षीस जिंकले गेलंय, असे अग्रवाल सांगतात. 

आमचं कुटुंब खूप आनंदी आहे आणि एवढी मोठी रक्कम मिळेल असा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, असे शीतल सिंग यांचा नातू सुखप्रीत याने सांगितले. 

(ही बातमी सामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास कोणत्याही लॉटरी खरेदी-विक्रीला प्रोत्साहन देत नाही.)