नोकरी सोडली आणि बनला शेतकरी! मातीत राबला,संघर्ष केला; करतोय वर्षाला 22 लाखांची कमाई

Farmers Success Story: सुधांशू यांनी पारंपारिक शेती न करता प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 17, 2024, 07:08 PM IST
नोकरी सोडली आणि बनला शेतकरी! मातीत राबला,संघर्ष केला; करतोय वर्षाला 22 लाखांची कमाई title=
Sudhanshu Kumar Farmer Success Story

Farmers Success Story: आजकाल तरुण नोकरीधंदा सोडून शेती व्यवसायाकडे वळले आहेत. कृषीचा अभ्यास करुन शेतीतून चांगली कमाई करता येते हे तरुणांच्या लक्षात आले आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होतेय. अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या यशाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. शेती हे उत्पन्नाचे एक चांगले साधन असून सुशिक्षित लोक याकडे आकर्षित झालेले आपण गेल्या वर्षांमध्ये पाहत असू. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील लाखो रुपयांचे पॅकेज असलेल्या नोकऱ्या सोडून तरुण शेती करत आहेत. आज आपण सुधांशू कुमार या अशाच एका शेतकऱ्याबद्दल जाणून घेऊया. ज्यांनी पारंपारिक शेती न करता प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली. आज एक यशस्वी शेतकरी अशी त्यांची ओळख आहे.

शेतात घेतली ही पिके 

सुधांशू कुमार हे मुळचे बिहारमधील समस्तीपूर येथे राहणारे आहेत. आपण लिचीची लागवड करावी अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली. यासाठी खूप संशोधन केले.खूप मेहनत घेतली. काही वर्षे उलटली. आता त्यांना मेहनतीचे फळ मिळू लागले आहे. ते चांगली कमाई करतायत.

सुधांशू यांनी गेल्या 34 वर्षांपासून स्वत:ला शेतीसाठी झोकून दिले आहे. ते 15 एकर जमीनीत घाम गाळत आहेत. येथे त्यांनी  लिचीसोबतच स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, कस्टर्ड ऍपल आणि इतर अनेक पिकांची लागवड केली आहे. कृषी जागरण यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सुधांशू शेतीतून दरवर्षी सरासरी 20 ते 22 लाख रुपये इतकी कमाई करतात. 

नोकरी सोडून शेती करायला सुरुवात 

सुधांशू यांनी इतिहास विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर केरळमधील मुन्नार येथील टाटा टी गार्डनमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून करिअरचा प्रवास सुरू केला. या नोकरीत चांगला पगार मिळत होता. घरच्यांना द्यायला वेळही मिळत होता. तसं पाहायला गेलं तर सर्वकाही ठिक चाललं होतं. तरीही मनात एक अस्वस्थता होती. की आपल्याला आयुष्यभर नोकरी करत राहायचं नाहीय, आपल्याला शेती करायचीय, स्वत:चा उद्योग करायचाय, असे त्यांना सतत वाटत राहायचे. 

शेतीतील आव्हाने

आपली आवड पूर्ण करण्यासाठी सुधांशू यांनी हातच्या नोकरीवर पाणी सोडले आणि आपल्या गावी परतले. आपण शेती करण्याची यावर ते ठाम होते. मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता. उजाड जमिनीतून त्यांना शेतमळा फुलवायचा होता. त्यांनी आरपीसीएयू, पुसाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. 

कापणी आणि वर्गीकरण यांसारखे वैज्ञानिक तंत्र अवलंबले. लवकरच त्यांच्या मेहनतीला फळ आले. सुरुवातीला त्यांना शेतीतून 25 हजार रुपये इतके उत्पन्न मिळायचे. पण आता त्यात कैक पटीने वाढ झाली. आता त्यांना जमिनीतून 1 लाख 35 हजार रुपये मिळू लागले. यामुळे सुधांशू यांचा आत्मविश्वास वाढला. यामुळे सुधांशू यांना कृषी क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.

शेतीतले तंत्रज्ञान

यानंतर सुधांशू यांनी आपले लक्ष लिचीच्या बागेकडे वळवले. त्यांनी  लिची लावण्यास सुरुवात केली. मात्र यातही अनेक अडचणी होत्याच. त्यांना सिंचनाशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागला. यावर काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता. मग त्यांनी स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा अवलंब केला. आता तर संघर्षांना सुरुवात झाली होती. पुढे उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठीही संघर्ष करावा लागला. चांगली बाजारपेठ शोधण्यासाठी त्यांनी मुझफ्फरपूरमधील प्रोसेसरशी संपर्क साधला. त्यांनी सुधांशू यांच्याकडून लिची खरेदी करण्यास सहमती दर्शवली. 

यातपण एक गोम होती. प्रोसेसर वाल्यांना सकाळी 9 वाजताच लिची हवी होती. सुधांशू राहत होते तिथपासून ही जागा 100 किमी दूर होती. सुधांशू यांनी हार मानली नाही. त्यांनी दिवसरात्र एक केला. मेहनत घेतली. रात्रभर लिचीची काढणी केली. त्यांच्या मेहनतीला फळ आले. लिचीच्या  उत्पादनात सुधांशू यांना 3 लाख 65 हजार रुपयांचा फायदा झाला. 

सुधांशू यांनी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून त्यांचे उत्पन्न 20 वर्षांत 3 लाख रुपयांवरून 20 ते 22 लाखांपर्यंत वाढले. अलीकडेच त्यांनी 15 एकर लिचीची बाग 32 लाख रुपयांना विकली आहे. पुढे जाऊन त्यांना शेतीतूनच अजून कमाई करायची आहे.