मुंबई : प्रत्येक मोठ्या यशामागे अथक परिश्रम, मेहनत, परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द महत्वाची ठरते. हाती कोणतेही विशेष संसाधने नसताना गरीबीच्या परिस्थितीतून IAS झालेला अधिकारी म्हणजे वरुण बरनवाल होय. ठाण्याच्या बोइसर परिसरात राहणाऱ्या वरुणने 2013 साली संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. या परीक्षेत वरुणला देशात 32 रॅंक मिळाली. वरुणच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा त्याने त्याचा सामना मोठ्या हिंमतीने केला. परिणामी वरुणच्या नावामागे आज देशातील प्रतिष्ठित सेवेची म्हणेजेच IAS अशी अक्षरं लागतात.
वरुणचं बालपण मोठ्या आव्हानांनी भरलेलं होतं. तेव्हापासूनच त्याला परिस्थितीशी झगडा करण्याची सवय झाली होती. 10 वीच्या परीक्षेनंतर त्याच्या वडीलांचे निधन झाले. ते सायकल रिपेअरींग करीत असत. कुटूंबाची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने वरुणने स्वतः सायकल रिपेअरींगचे दुकान सांभाळले. 10 वीच्या निकालात वरुणने टॉप केले होते.
वरुणला आईने पुढे शिक्षण सुरू ठेवण्यास सांगितले आणि स्वतः दुकानाची जबाबदारी सांभाळायला सुरूवात केली. परंतु अजूनही अडचणी कमी झाल्या नव्हत्या. 11 वीच्या प्रवेशासाठी वरुणकडे पैसे नव्हते. त्यावेळी वडीलांचे उपचार केलेल्या डॉक्टरांना त्यांनी हे परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी लगेच 11 वीच्या प्रवेशासाठी आणि अभ्यासासाठी पैसे दिले.
वरुणचे शिक्षण आव्हानांशी झगडा करीत सुरू झाले होते. सकाळी महाविद्यालयात जात असे, तेथून आल्यावर शिकवणी घेत असे,रात्री पुन्हा दुकानाचा हिशोब पाहत असत मगच झोपत असे. महाविद्यालयीन शिक्षणाच्या फीसाठी पैसे नसल्याने शिक्षकांनी पगारातून थोडे पैसे काढून त्याच्या दोन वर्षांची फी भरली होती.
वरुणची शिक्षणाप्रती तळमळ पाहून त्याची बहिण देखील त्याला मदत म्हणून शिकवणी घेत असे. वरुणला डॉक्टर व्हायचे होते परंतु त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने त्याने इंजिनिअरिंग करायचे ठरवले. जमिनीचा तुकडा विकून त्यांनी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाची फी भरली. त्यानंतर फर्स्ट इयरमध्ये टॉप केल्याने वरुणला स्कॉलरशिप मिळाली. दरम्यान येणाऱ्या छोट्या मोठ्या गरजा मित्रांच्या मदतीने पूर्ण झाल्या. हळू हळू वरुणने इंजिनिअरिंग देखील टॉप रॅकिंगने पूर्ण केली.
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर वरुणला एमएऩसी कंपनीत नोकरी मिळाली. कुटूंबाची इच्छा होती वरुणने नोकरी करावी. परंतु यावेळी वरुणला IAS होण्याचे स्वप्न खुणावत होते. पुन्हा एकादा कुटूंबाने वरुणला साथ दिली. वरुणने पुण्यात युपीएससीचा अभ्यास सुरू केला. आतापर्यंत केलेला संपूर्ण संघर्ष, परिश्रम डोळ्यासमोर ठेऊन नागरी सेवा परीक्षेच्या मैदानात उतरला आणि या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात 32 वा क्रमांक पटकावला. या रॅंकिंगसह वरुणला IAS सेवा देखील मिळाली.
सध्या वरुण गुजरात केडरला कार्यरत आहेत. देशातील अनेक विद्यार्थी, तरुण, युपीएससीची तयारी करणारे उमेदवार यांच्यासाठी वरुण आदर्श उदाहरण आहे.