सिक्कीम : सिक्कीममध्ये चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारत-चीनच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमा रेषेवर ३-३ हजार जवान तैनात केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील १७ माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील २७ माऊंटन डिव्हिजनचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
काही दिवसांपूर्वी डोका-लामध्ये झालेल्या घटनेनंतर अधिक तणाव निर्माण झाला आहे. तसेच दोन्ही देशांचे सैन्यही मागे हटण्यास तयार नाहीत. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या फ्लॅग मिटींग होऊनही हा तणाव कमी झालेला नाही असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सीमारेषेवर ३००० जवान तैनात करण्यात आले आहेत.
चीन डोका-लामध्ये 'क्लास-४०' रस्त्याचे बांधकाम करत आहे. या रस्त्यावरुन चिनी सैन्याचे ४० टनापर्यंतच्या लष्करी वाहनांची वाहतूक होऊ शकते. यामध्ये रणगाडे, तोफा यांचा समावेश आहे. चीनने नुकतेच तिबेटमध्ये ३५ टनांच्या नव्या टँकची चाचणी केली होती. सीमा क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे संरक्षण खात्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
भारतीय सैन्य डोका-ला भागामध्ये होणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहे तसेच हा प्रदेश सिलिगुडी कॉरिडोरच्या जवळच आहे. हा भाग भारतासाठी महत्त्वाचा असल्यामुळे चीनला रोखण्यासाठी सिलीगुडी कॉरिडोरमध्ये भारतीय सैन्याने आपली बाजू भक्कम केली आहे.