Tata Steel Steam Leak: टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये गळती; 19 जण जखमी

Tata Steel Plant Steam Leak: ओडिशामधील (Odisha) टाटा स्टीलच्या (Tata Steel) प्लांटमध्ये वाफेची गळती झाली आहे. प्लांटमधील ब्लास्ट फर्नेसची पाहणी करणारे कामगार आणि अभियंते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 13, 2023, 07:22 PM IST
Tata Steel Steam Leak:  टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये गळती; 19 जण जखमी title=

Tata Steel Plant Steam Leak: ओडिशाच्या (Odisha) ढेंकनाल जिल्ह्यातील टाटा स्टीलच्या (Tata Steel) मेरामंडली प्लांटमध्ये वाफेची गळती झाली आहे. मंगळवारी झालेल्या वाफेच्या गळतीमुळे जवळपास 19 लोक जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गंभीर भाजलेल्या जखमींना तातडीने कटक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लांटमधील ब्लास्ट फर्नेसची पाहणी करणारे कामगार आणि अभियंते जखमी झाले आहेत. टाटा स्टीलने निवदेन प्रसिद्ध केलं आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजता कामाची पाहणी केली जात असतानाच ही दुर्ठना घडली. यानंतर कामावर हजर असणाऱ्या काहींना याची छळ बसली. 

खबरदारीचा उपाय म्हणून जखमींना ताबडतोब प्लांटच्या आवारातील व्यावसायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना कटक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं अशी माहिती निवेदनात दिली आहे. जखमींसह डॉक्टर आणि पॅरामेडिक्स होते असंही सांगण्यात आलं आहे.

टाटा स्टीलने दिलेल्या माहितीनुसार, सर्व इमर्जन्सी प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले होते आणि परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. "आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत असून दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत तपास सुरू केला आहे," अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.