State Assembly Election 2024: लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडीशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 13 मे रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल 20 मार्च अधिसूचना, 19 एप्रिल रोजी मतदान होईल.
सिक्कीम 19 मार्चची अधिसूचना, 20 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ओडिशात दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 29 एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना 7 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे.
ओडिशातील 147, सिक्कीममधील 32, अरुणाचल प्रदेशातील 60 आणि आंध्र प्रदेशातील 175 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. ओडिशात बिजू जनता दल (बीजेडी) सत्तेत आहे. येथे त्यांची भाजपची थेट स्पर्धा आहे. नवीन पटनायक 2000 पासून येथे मुख्यमंत्री आहेत.
YSR काँग्रेस पक्ष (YSRCP) नेते जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. येथे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी (टीडीपी), अभिनेता पवन कल्याणची जनसेना आणि भाजप युती एकत्र निवडणूक लढवत आहेत.
अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. 2019 मध्ये पक्षाने 60 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय सिक्कीममध्ये प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सरकार आहे. येथे युती सरकारमध्ये भाजपचा समावेश आहे.
पहिला टप्पाः 19 एप्रिल रोजी मतदान
दुसरा टप्पाः 26 एप्रिल रोजी मतदान
तिसरा टप्पाः 7 मे रोजी मतदान होणार
चौथा टप्पाः 13 मे रोजी मतदान
पाचवा टप्पाः 20 मे रोजी मतदान
सहावा टप्पाः 25 मे रोजी मतदान
सातवा टप्पाः 1 जून रोजी मतदान
निकालः 4 जून रोजी