नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी वादावर स्वेच्छेने मध्यस्थी करत असल्याचं आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर हे म्हणाले. वादाशी संबधित सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी १६ नोव्हेंबरला अयोध्येचा दौरा करणार असल्याचे श्री श्री रवीशंकर म्हणाले. गेल्या महिन्यांत काँग्रेसने श्रीश्रींवर सरकारचे एजंट अशी टीका केली होती.
अयोध्या वादावर तोडगा निघणं शक्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मात्र या कामासाठी आर्ट ऑफ लिविंगच्या संस्थापकांची निवड कुणी केली असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता.
एकीकडे अयोध्या मुद्द्यावर मुस्लिम नेते श्री श्री रविशंकर यांना भेटले असताना MIMचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी मात्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं रविशंकर यांच्याशी बोलण्याची तयारी दर्शवली नसल्याचा दावा केलाय.
दरम्यान, श्री श्री रवीशंकर अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचं सांगत असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मंगळवारपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ अयोध्येतूनच फोडणार आहेत. सोळा महापालिका, १९८ नगरपालिका आणि ४३८ नगर पंचायतीसाठी होणा-या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ योगी आदित्यनाथ सुरुवात करणार आहेत. मंगळवारी गोंडा आणि बहराईचमध्ये आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर या निवडणुका होतायत. योगी आदित्यनाथ यांनी या निवडणुकांसाठी रविवारी भाजपचं संकल्प पत्र जारी केलंय. भाजप सरकारने अयोध्या आणि मथुरा-वृंदावन पालिकांचं गठन केल्याचं आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं होतं. उत्तर प्रदेशात तीन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्या महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत दिवाळी साजरी केली होती. यानंतर आदित्यनाथ यांच्यावर टीकाही झाली होती.