नवी दिल्ली: दिल्लीतील वायू प्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांच्या साहाय्याने शहरावर पाण्याचा मारा करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोणी येथील आमदार आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी अशी मागणी केली. यासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांच्या साहाय्याने आकाशातून पाण्याचा मारा करावा. तसेच आकाशात मेघ बीजरोपण करून दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे लोकांसाठी श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत सम-विषम वाहनांची योजना लागू करण्यात आली. या योजनेनुसार एका दिवशी सम तर दुसऱ्या दिवशी विषम क्रमांकाच्या गाडय़ा चालवण्याची परवानगी आहे.
दिल्लीत वायू प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी रस्त्यावर पाण्याचा मारा
Nand Kishor Gurjar, BJP MLA from Loni, Ghaziabad writes to Prime Minister Narendra Modi requesting to sprinkle water with the assistance of Air Force, & induce artificial rain, in the Delhi National Capital Region (NCR) region, to reduce air pollution. pic.twitter.com/6o13FNcyev
— ANI UP (@ANINewsUP) November 5, 2019
तसेच सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीच्या परिक्षेत्रातील सर्व प्रकारची बांधकामे, बेकायदा बांधकामांवरील कारवाई आणि कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे. वायू प्रदूषणामुळे लोक त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे गमावत आहेत, अशी उद्विग्नता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित यंत्रणांना धारेवर धरले.