सप-बसप आघाडी झाल्यास भाजपला मोठा धक्का - सर्वेक्षण

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७१ जागा भाजपने जिंकल्या होत्या.

Updated: Dec 25, 2018, 09:08 AM IST
सप-बसप आघाडी झाल्यास भाजपला मोठा धक्का - सर्वेक्षण title=

नवी दिल्ली - लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधक महाआघाडी करण्याच्या तयारीत आहे. तर काही पक्ष महाआघाडीत न जाता आपापल्या पातळीवर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेश हे राज्य लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे आहे. पण यंदाच्या निवडणुकीत जर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडी झाली तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. 'एबीपी न्यूज आणि सी व्होटर' यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. पण त्याचवेळी ही आघाडी झाली नाही तर भाजपला मोठा फायदाही होऊ शकतो, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

जर उत्तर प्रदेशात सप आणि बसप यांच्यात आघाडी झाली तर लोकसभेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा २४७ पर्यंत खाली येऊ शकतात. म्हणजेच या आघाडीला स्पष्ट  बहुमत मिळणार नाही. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी २५ जागा कमी पडतील. या दोन्ही पक्षांमध्ये काही कारणाने आघाडी झाली नाही, तर त्याचा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला होऊ शकतो. एनडीएच्या जागा गेल्यावेळेपेक्षा वाढू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेशात सप-बसपची आघाडी होणार की नाही यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७१ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला एकट्याच्या बळावर लोकसभेत बहुमत प्राप्त करता आले होते. आता जर सप-बसप आघाडी झाली तर या दोन्ही पक्षांना मिळून ५० पर्यंत जागा मिळू शकतात. तर भाजपच्या जागा कमी होऊन २८ पर्यंत खाली येऊ शकतात. गेल्यावेळेपेक्षा भाजपच्या ४३ जागा कमी होऊ शकतात. 

ओडिसामध्ये भाजपच्या जागा गेल्यावेळेपेक्षा वाढून १५ पर्यंत जातील. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांत भाजपला फायदा होईल, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.