सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार-सूत्र

सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. 

Updated: Aug 24, 2020, 06:41 PM IST
सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार-सूत्र title=

नवी दिल्ली : सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, सीडब्ल्यूसीने या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. काँग्रेस नेतृत्वाचा मुद्दा देशात चर्चेत होता. आज दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाच्या प्रश्नावर खुली चर्चा झाली. या बैठकीदरम्यान पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं की, 'त्यांना पक्षाध्यक्षपदी पुढे रहायचे नाही. परंतु अनेक नेत्यांनी त्यांना पदावर कायम रहाण्याचे आवाहन केले आहे.'

याआधी सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी पक्षाच्या नेत्यांना नवीन अध्यक्ष निवडण्यास सांगितले होते. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए.के अँटनी यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांना पदावर कायम राहण्याचे आवाहन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सीडब्ल्यूसीची ही बैठक सुमारे 2 आठवड्यांपूर्वी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून बोलविण्यात आली होती. सीडब्ल्यूसीचे सदस्य, यूपीए सरकारमधील मंत्री असलेले नेते आणि खासदार अशा किमान 23 नेत्यांनी संघटनेच्या विषयावर सोनिया गांधी यांना पत्र लिहिले. पत्रात असे म्हटले गेले होते की, नेतृत्व असे असले पाहिजे की ते सक्रिय असले पाहिजे आणि ग्राऊंड लेवलला काम केले पाहिजे.'

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय सिंह यांनी पत्र वादावर भाष्य करत म्हटले की, हे पत्र कोणत्याही व्यक्ती किंवा गांधी कुटुंबाच्या विरोधात नव्हते. ती फक्त एक सूचना होती. सोनिया जी हे पद सांभाळण्यास तयार नाहीत, अशा परिस्थितीत राहुल गांधी जर पदभार स्वीकारण्यास तयार असतील तर ठीक आहे. परंतु तसे नसल्यास पक्षनेत्यांनी पक्ष घटनेनुसार विचार करून निर्णय घ्यावा.

दुसरीकडे, दिल्लीतील काँग्रेसचे नेते संदीप तंवर यांनी काँग्रेस नेतृत्व वादावर रक्ताने एक पत्र लिहिले. तंवर यांनी हे पत्र राहुल गांधींना अध्यक्ष बनविण्याच्या बाजूने लिहिले आहे. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जर राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष केले गेले नाही तो पक्षाच्या हितातील निर्णय नसेल. कारण राहुल गांधींनी ग्राऊंड लेवलला काम केले आहे.