Crime News In Marathi: उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. 24 वर्षांच्या तरुणाने आपल्याच आईची हत्या घडवून आणली आहे. याबाबत आरोपीच्या वडिलांनीच पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आरोपीला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून पोलिसांनी 52 वर्षांच्या चंदा देवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीचे नाव अजय असून त्याचे वय 24 वर्षे इतके आहे. तो आई चंदा देवी आणि वडिलांसोबत देहरादून येथे भाड्याच्या घरात राहत होता. या कुटुंबाचे मुळ गाव चंपावत जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आईवर नाराज होता. अचानक एक दिवशी त्याने त्याच्या आईची हत्या केली.
आईची हत्या केल्यानंतर अजयने आर्मीमध्ये ड्युटीवर असलेल्या त्याच्या मोठ्या भावाला याबाबत सांगितले. छोट्या भावाच्या या कृत्याने हादरलेल्या भावाने तातडीने त्याच्या वडिलांना सांगितले त्यांनंतर लगेचच पोलिसांना याबाबत सांगण्यात आले. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली आहे. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. आरोपीचे वडिल आर्मी रिटायर ऑफिसर असून ते आयएमएमध्ये नोकरी करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अल्सरेटिव कोलाइटिस हा आजार आहे. पोलिसांना आऱोपीच्या चौकशीतून जे काही समजलं ते फारच धक्कादायक होतं. आरोपीला जो आजार आहे त्याबद्दल त्याने इंटरनेटवर सर्च केले. तेव्हा त्याला कळालं की हा आजार स्लो पॉइजन देण्याने होतो. त्यामुळं त्याचा त्याच्या आईवर संशय गेला. त्याला वाटू लागले की त्याची आई त्याला जेवणातून स्लो पॉइजन देतेय. त्यामुळंच त्याने त्याच्या आईचीच हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देहरादूनचे एसएसपी अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसीर, आरोपी तरुणाने इंटरनेटवर त्याच्या आजाराबाबत सर्च केले. तेव्हा त्याला कळले की सतत स्लो पॉइजन दिल्या गेल्यावर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. तेव्हापासून तो त्याच्या आईवर संशय येत असे. त्याच रागातून त्याने त्याच्या आईची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.