भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणते असा प्रश्न विचारला तर कदाचित बिर्याणी (Biryani) पहिल्या क्रमांकावर येईल. भारतामध्ये बिर्याणी आवडणार नाही असं एकही ठिकाण नाही. ऑनलाइन ऑर्डर होणाऱ्या पदार्थांमध्ये नेहमी बिर्याणीच पहिल्या क्रमांकावर असते. त्यामुळेच अनेकदा बिर्याणी बनवताना त्यात वेगवेगळे प्रयोग केले जातात. याआधी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील अनेक बिर्याणी पाहिल्यानंतर खाद्यप्रेमींनी नाराजी जाहीर करत बिर्याणीला न्याय द्या अशी मागणी केली आहे. त्यातच आता आणखी एक असाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर एका तरुणीचा पार्ले-जी बिर्याणी (Parle G Biryani) बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे, पार्ले-जी बिर्याणी. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बिर्याणी बनवताना तरुणीने त्यात पार्ले-जी फ्लेव्हरचा वापर केला आहे.
@creamycreationsbyhkr11 या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तरुणी फार कौतुकाने आपण केलेली बिर्याणी दाखवत आहे. तिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता दिसत असली तरी ती कमेंट सेक्शनमध्ये दिसत नाही. कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी ही बिर्याणी पूर्णपणे नाकारली आहे.
कूकचा दावा आहे की त्यांनी बिर्याणी मसाला पार्ले-जी बिस्किटांमध्ये मिसळला आहे. पण व्हि़डीओत मसाला स्पष्टपणे दिसत नसला तरी, आम्ही भाताच्या वर पसरलेली अनेक बिस्किटं दिसत आहेत.
या रीलला 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. दरम्यान कमेंटमध्ये अनेकांनी खिल्ली उडवली आहे. एका युजरने चहाबरोबर खायचं की रायताबरोबर असी विचारणा केली आहे. कृपया हे थांबवा. आता तुम्ही जरा जास्तच करत आहात असं एकजण म्हणाला आहे. तर एकाने मला यावर विश्वास ठेवायचा नाही असं म्हटलं आहे.
एका युजरने पार्ले-जीला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर एकाने कोपऱ्यात बिर्याणी रडत आहे असा टोला लगावला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा शेवटचा वर्ग असा टोला एकाने लगावला आहे. तर एकाने ओरिओ फ्लेवरची बिर्याणी कधी? असं उपहासात्मकपणे विचारलं आहे.
याआधी, एका व्लॉगरने पार्ले-जी बिस्किटांचा वापर करत गुलाब जामुनचा एक प्रकार बनवला होता. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला 32 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी याला विरोध केला होता.