Crime News : छत्तीसगढच्या (Chhattisgarh) कवर्धा जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील आदिवासीबहुल तारेगाव येथे घडलेल्या या भीषण घटनेने गावकऱ्यांना हादरवून सोडले आहे. लग्न समारंभानंतर (wedding dance) जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळी गावकरी आणि नातेवाईकांच्या समोरचा एका व्यक्तीने आपल्या दोन लहान भावांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. मुलाच्या लग्नात बापाने आपल्याच दोन भावांची निर्घृणपणे घराच्या अंगणातच हत्या केली. यासोबतच या माथेफिरुने मेव्हणा आणि मोठ्या भावावरही हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
तरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तिनहा बेगा (46) याच्या मुलाचे रविवारी लग्न होते. सोमवारी लग्नानंतर नवरी मुलगी घरी आली होती. त्यानंतर तिनहा बेगाने काही विधी पूर्ण करण्याबरोबरच गावकऱ्यांना जेवणासाठी बोलावले होते. विधी सुरू असताना तिन्हाची पत्नी मुलाच्या लग्नाच्या आनंदात नाचत होती. त्यांचे दोन भाऊ जगत बेगा आणि टिकू बेगा हे देखील नाचत होते. आपल्या दोन लहान भावांना पत्नीसोबत नाचताना पाहून तिन्हा संतापला.
तिन्हाला आपल्या पत्नीसोबत भावांनी नाचणे आवडले नाही. त्याने कुऱ्हाड घेऊन दोन्ही सख्ख्या भावांवर हल्ला केला. दोघांच्या डोक्यावर व शरीराच्या इतर भागावर इतके वार केले की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता. त्यानंतर तिन्हाने पत्नी, मेहुणा सुखराम बेगा आणि मोठा भाऊ तुन्हा बेगा यांच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. यामुळे तेह जखमीही झाले. या सर्व प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. सर्व नातेवाईक घराबाहेर पळू लागले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आले.
हा सगळा धक्कादायक प्रकार नवदाम्पत्याच्या डोळ्यांसमोरच घडला. मात्र आरोपी तिन्हाचा राग पाहून त्याला रोखण्याचे कोणाचेही धाडस होत नव्हते. या घटनेनंतर बेगा कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे सगळं गाव दहशतीखाली आहे.
हत्येचे कारण आले समोर...
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र घराचा परिसर पाहून त्यांनाही धक्का बसला. दोन्ही भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर आरोपी तिन्हा याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. हत्येवेळी आरोपी दारूच्या नशेत होता. पोलिसांच्या चौकशीत तिन्हाने सांगितले की, "मला संशय होता की माझे दोन्ही धाकटे भाऊ पत्नीशी शारीरिक संबंध ठेवत आहेत. मला पत्नीच्या चारित्र्याबद्दल आधीच शंका होती आणि लग्नात भावांसोबत नाचताना पाहून मला कळून चुकले. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही." दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.