Shocking Sexual Abuse Case: कोलकात्यामधील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन देशभरामध्ये संतापाची लाट आहे. महाराष्ट्रामध्येही बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण गाजत असून त्यावरुन राजकारण तापल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच तामिळनाडूमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला पोस्को कायद्याअंतर्गत स्वत:च्याच 6 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पुलियनथोप येथून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेला आरोपी त्याच्या पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीबरोबर राहत होता असं सांगितलं आहे. शुक्रवारी या चिमुकल्या मुलीच्या डोक्यावर जखमा दिसून आली. त्यावेळी तिला तिच्या आईने इग्मोरे येथील मुलांच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी या मुलीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. या जखमा आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी नियमाप्रमाणे चाइल्ड वेअलफेअर कमिटीच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. या अधिकाऱ्यांनीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुलीच्या आईची आणि वडिलांची चौकशी केली. वडिलांनी सुरुवातीला आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. आपला याच्याशी काहीही संबंध नाही असं पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसी खात्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ही बातमी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "सहा महिन्यांची चिमुकली स्वत:च्या घरात स्वत:च्या वडिलांबरोबरही सुरक्षित नाही मग ती कुठे सुरक्षित राहू शकते? आपल्याला नेमकं काय झालं आहे? आपण कोणत्या राक्षसांमध्ये राहतोय? मुलगी म्हणून जन्माला येणं गुन्हा आहे का? पुन्हा एकदा हे वाचून पाहा ती केवळ सहा महिन्यांची आहे," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे.
मागील काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून लैंगिक अत्याराच्या घटनांसंदर्भातील बातम्यांचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे. कोलकात्यामधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लैंगिक अत्याचारासंदर्भातील कायदे अधिक कठोर करण्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे हे असे प्रकार समोर येत असल्याने सामाजिक परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्रत्येकाने पुढाकार घेऊन लैंगिक अत्याचारांविरोधात उभं राहिलं पाहिजे असं आवाहन सामाजिक संस्थांकडून केलं जात आहे.