दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अयोध्या : उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मात्र या निमित्तानं आणखी एक चर्चा सुरू झालीये, ती आगामी निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या संभाव्य युतीची... युती होणार नाही, स्वबळावर लढणार असं उद्धव ठाकरेंपासून ते तमाम शिवसेना नेते वारंवार सांगतायत. तर मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे नेते युती व्हायला हवी, असं कळकळीनं सांगतायत. आता उद्धव यांचा अयोध्या दौरा म्हणजे भविष्यातल्या युतीसाठी पायाभरणी असल्याची चर्चा सुरू झालीये.
अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर सगळी सूत्र हालल्याचं बोललं जातंय.
उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जायचं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किमान लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यायचं असं ठरलेलं असू शकतं.
उद्धव परत येतील, तेव्हा त्यांच्या मनातलं भाजपाविषयीचं किल्मिश दूर होईल असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
उद्धव यांच्या अयोध्या भेटीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
अमित शाह यांच्या मातोश्री वारीनंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचीही अनेकदा बंद दाराआड चर्चा झाली.
यावेळी नेमकं काय ठरलं असेल हे रामलल्लाच जाणो...
गेल्या ४ वर्षांत युतीचे ताणले गेले असताना दोन्ही भगव्या पक्षांना पुन्हा निवडणुकीत एकत्र येण्यासाठी 'रामबंधन' हाच एकमेव समान धागा आहे, हे मात्र नक्की.