लंच पे चर्चा! महाराष्ट्रात कट्टर विरोधक, लडाखमध्ये एकत्र जेवण आणि गप्पा

महाराष्टातल्या कट्टर विरोधकांच्या लेह लडाखच्या थंड हवेत तलवारी म्यान

Updated: May 19, 2022, 01:44 PM IST
लंच पे चर्चा! महाराष्ट्रात कट्टर विरोधक, लडाखमध्ये एकत्र जेवण आणि गप्पा title=

Sanjay Raut Meet Ravi Rana : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी गदारोळ उडवून दिला होता. राणा दाम्पत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती.

यावर शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच पेटला होता. 

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे राणा दाम्पत्य आणि खासदार संजय राऊत सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातला एक फोटो समोर आला आहे. महाराष्ट्रातले हे कट्टर विरोधक लेह-लडाख दौऱ्यात चक्क एकत्र जेवण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसोबत गप्पा मारताही दिसून आले. 

संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. या समितीत 30 खासदारांचा समावेश असून यात महाराष्ट्रातील तीन खासदार आहेत.  खासदार संजय राऊत, खासदार प्रकाश जावडेकर आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यावर गेले आहेत. 

हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या आणि टीकेच्या फैरी झाडणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवणाच्या टेबलावर एकत्र आले. त्यांनी केवळ जेवणाचा तर आस्वाद घेतलाच शिवाय संवादही साधल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.