राहुल गांधी भारत सोडून विदेशात जाऊ शकतात, शिवसेनेचा 'बाण'

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विदेश जाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने छेडले आहे.

Updated: Jun 3, 2019, 08:57 PM IST
राहुल गांधी भारत सोडून विदेशात जाऊ शकतात, शिवसेनेचा 'बाण' title=

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विदेश जाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने छेडले आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसकडे विरोधी पक्षपद मिळेल इतकेही खासदार नाही आहेत. राहुल गांधी देश सोडून परदेशी गेले तर आश्चर्याची गोष्ट नसेल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. 135 वर्षांच्या काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळत नाही. राज्या राज्यांमधील काँग्रेसमध्ये फूट पडत आहे. हे काँग्रेस संपण्याचे पर्व थांबणार नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या काँग्रेसचे साधारण 52 खासदार निवडून आले. हाच मुद्दा घेऊन शिवसेनेने राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 च्या तुलनेत अधिक शक्तिशाली बनले आहेत. अमित शाह यांच्याकडे सर्व जबाबदाऱ्या देऊन ते 2 दिवसांसाठी केदारनाथला गेले. जेव्हा परत आले तेव्हा 2019 चा राजमुकुट घेऊन शाह तयार होते. हे वेगळच रसायन आहे. राहुल गांधी हे निवडणूक प्रचारात जोरजोरात बोलत होते. पण निवडणूक निकालानंतर ते अज्ञातवासात निघून गेले. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद देखील सोडले. उद्या देश सोडून गेले तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण अनेक राज्यांमध्ये त्यांच्या लोकांनी शस्त्र खाली ठेवले आहे. कर्नाटक, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश येथील त्यांचे सरकार देखील कधीही पडू शकते आणि खासदार भाजपात जाऊ शकतात हे स्पष्ट आहे. 

राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस पार्टीने आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे किंवा ठाकरे घराण्यातील कोणीही निवडणूक लढवत नाही. ते याबद्दल काय बोलणार ? त्यामुळे शिवसेनेचे नेतेच परदेशात पळू शकतात असा टोला महाराष्ट्र यूथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी लगावला आहे. 

राहुल गांधी हे वर्षातून दोन ते तीन वेळा विदेश दौऱ्यावर जातात.2014 लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतरही ते विदेश दौऱ्यावर गेले होते. जून 2016 मध्ये आपला वाढदिवस तुर्की येथे साजरा केला होता. तर 2017 सालचा वाढदिवस आपले आजोळ इटलीत साजरा केला. पार्टीला न सांगताही राहुल गांधी अचानक सुट्टीवर गेल्याचा आरोप विरोधक करतात.