... अन् शिवराज सिंह चौहान यांनाही अश्रू रोखता आले नाहीत!

५ वर्षांच्या आधीच पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही येऊ शकतो.

Updated: Dec 20, 2018, 05:27 PM IST
... अन् शिवराज सिंह चौहान यांनाही अश्रू रोखता आले नाहीत!  title=
pti

मध्यप्रदेश: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्याचे अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थान सोडण्याआधी कार्यकर्त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चौहान यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे की, मध्य प्रदेशात सत्ता स्थापन केली नसली म्हणून काय झाले, आमच्या पक्षाचे सामर्थ कायम येथे राहणार आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांसमोर बोलताना ते म्हणाले की, कदाचित ५ वर्षांच्या आधीच पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही येऊ शकतो. तसेच नव्या अंदाजात त्यांनी ‘चिंता मत करना, टायगर अभी जिंदा है’असे समर्थकांना सांगितले.

मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा अवघ्या काही जागा जास्त मिळवून मध्य प्रदेशात सत्ता मिळवली. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला युती करण्याची गरज पडली आहे. बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली. या पक्षांनी काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतल्यास, काँग्रेस पक्षाला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. 
  
मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांनी वेगळीच छाप निर्माण केली होती. शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. १५ वर्षांनंतर ते भोपाळमधील मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार आहेत. या कारणाने चौहान यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. तसेच शिवराज सिंह चौहान यांना भेटायला आलेले कार्यकर्ते भावूक होऊन रडू लागले. कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झाल्याने शिवराज यांनीच त्यांना शांत केले.