नवी दिल्ली : आरएलएसपी अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपुर्वीच आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कुशवाह हे विरोधी पक्षांच्या महागठबंधनमध्ये ते सहभागी होणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. पाच राज्यांतून येणाऱ्या निवडणूक निकालाच्या आधी एनडीएनने घेतलेल्या घटक पक्षांची महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यास उपेंद्र कुशवाहा यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर कुशवाह यांच्या बद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. यावेळी कुशवाह यांच्या बद्दल महत्त्वाची बातमी येत आहे. कुशवाह यांनी विरोधकांच्या महागठबंधनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महागठबंधनमध्ये आपण सहभागी होत असल्याचे कुशवाह यांनी महत्त्वाच्या नेत्यांसमोर जाहीर केले.
कॉंग्रेस नेता अहमद पटेल यांनी या संदर्भात औपचारीक घोषणा केली. उपेंद्र कुशवाह यांनी एनडीए सोडून महागठबंधनशी हात मिळवणी केल्याचे सांगत आम्ही त्यांचे स्वागत करत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे भाजपाने महागठबंधनवर निशाणा साधलाय. महागठवबंधनचा अर्थ भाजपाच्या विरोधात सर्व विरोधी पंक्षांनी यावे असा होत नसल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले.
2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर असताना उपेंद्र कुशवाह हे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे ते कधीही एनडीए सोडून महागठबंधनमध्ये सामिल होतील असे तर्क गेले काही दिवस लढवले जात होते. काही दिवसांपुर्वी झालेल्या मोतिहारी पार्टीत त्यांनी युपीएमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले होते. बिहारच्या नितीश सरकारवर ते सातत्याने हल्लाबोल करत राहिेले.
असं असलं तरीही उपेंद्र कुशवाह यांच्या पार्टीतील इतर आमदार, खासदारांचं यावरील मत वेगवेगळ आहे. आरएलएसपीचे खासदार अरूण कुमार यांनी भाजपाचे समर्थन कायम ठेवणार असल्याचं म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपाच समर्थन कायम ठेवणार असल्याचे अरूण कुमार यांनी 'इंडियन एक्सप्रेस' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
दुसरीकडे आरएलएसपीचे आणखी एका खासदार रामकुमार शर्मा यांनी उपेंद्र कुशवाह यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. सीतामढीचे खासदार रामकुमार शर्मा यांनी आपण कुशवाह यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले. तर आरएलएसपीचे दोन आमदार लल्लन पासवान आणि सुधांशु शेखर बंड करण्याच्या तयारीत आहेत. ते जेडीयूच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.