नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधातील (रालोआ) अविश्वास ठरावाच्यावेळी तटस्थ राहणार असल्याचे शुक्रवारी शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. शिवसेना खासदारांनी अविश्वास ठरावावेळी सरकारच्या समर्थनार्थ मतदान करु नये, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानंतर आज सकाळी शिवसेना खासदारांची दिल्लीत यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली.
शिवसेनेचे संसदेतले गटनेते आनंदराव अडसूळ यांनी उद्धव ठाकरेंच्या या आदेशाची माहिती शिवसेना खासदारांना दिली. या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या राज्यसभेतल्या खासदारांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील खासदार पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा दिल्लीत पक्षनेतृत्त्वापेक्षा पक्षाच्या खासदारांचीच चलती असल्याचे चित्र दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तत्पूर्वी खासदार चंद्रकांत खैरे यांनी परस्पर जारी केलेल्या व्हीपवरून पक्षात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मोदी सरकारच्या बाजूनं पक्षातील मतदान करण्याचा व्हीप खासदारांना जारी केल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. यावरूनच त्यांनी चंद्रकांत खैरे यांना 'चीफ व्हीप' अर्थात 'मुख्य प्रतोद प्रमुख' पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिला. मात्र, याबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.