नवी दिल्ली : टीडीपीने नरेंद्र मोदी सरकारविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात किंवा बाजून शिवसेना मतदान करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रस्तावाच्या वेळी चर्चेत शिवसेना सहभागी होणार आहे, मात्र मतदान करताना शिवसेना खासदार गैरहजर असणार आहेत. एकंदरीत या प्रस्तावावर शिवसेना तटस्थ राहणार आहे. हा अविश्वास प्रस्ताव केंद्रातील भाजपा सरकारसाठी अग्निपरीक्षा मानली आहे. शिवसेना खासदारांची सध्या दिल्लीत बैठक झाली, त्यात तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या तटस्थतेचा फायदा भाजपला होणार आहे, हे स्पष्ट आहे.
तेलगू देसम पार्टीने भाजपाविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे, त्यात शिवेसना तटस्थ राहणार असल्याचं शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने टीडीपी आणि भाजपा यांच्याशी याबाबतीत सारखंच अंतर ठेवलं आहे.
शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता, त्यावेळी शिवसेनेला टीडीपीचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी साथ दिली नव्हती, तर त्यांचं काहीही ऐकूनही घेतलं नव्हतं. हे अजूनही शिवसेना विसरलेली नाही, म्हणून टीडीपीच्या बाजूनेही शिवसेना मतदान करणार नाही, तसेच राज्यात भाजपावर नाराज असलेली शिवसेना भाजपाच्या बाजूनेही उभी राहणार नसून, शिवसेना या अविश्वास प्रस्तावात तटस्थ भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.