पटणा : अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सध्या भाजपच्या तिकीटावर बिहारच्या पटणा साहिबमधून लोकसभा खासदार आहेत. पण केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी शत्रुघ्न सिन्हा सोडत नाहीत. त्यामुळे 2019 सालच्या निवडणुकीमध्ये सिन्हांना भाजपकडून पुन्हा तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. शत्रुघ्न सिन्हा 2019 सालची निवडणूक लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीकडून लढणार आहेत.
लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यानं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टीला शत्रुघ्न सिन्हाही आला होता. यावेळी लालूंची मुलगी आणि खासदार मीसा भारतीनं शत्रुघ्न सिन्हांना पटणा साहिबमधून आरजेडी तिकीट देईल, अशी घोषणा केली. यानंतर शत्रुघ्न सिन्हानंही फिल्मी डायलॉग मारला. "सिचुएशन जो भी हो, स्थान यही होगा." असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी, तेजप्रताप आणि मीसासोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत. मी इकडे त्यांच्याच आमंत्रणामुळे आलो आहे. भाजप माझा पक्ष असला तरी हा माझा परिवार असल्याची प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हांनी दिली.