भाजपाच्या स्थापनादिनी शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश

सिन्हा यांना पाटना साहीबहून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 6, 2019, 03:40 PM IST
भाजपाच्या स्थापनादिनी शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश  title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि बंडखोर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिन्हा यांना पाटना साहीबहून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये सिन्हा इथून प्रचंड मतांनी विजयी झाले होते. लोकसभेवर निवडून गेल्यावर अवघ्या दोनच वर्षात त्यांनी मोदींवर तोफ डागायला सुरूवात केली. तिसऱ्या आघाडीच्या विविध सभांनाही सिन्हा यांनी हजेरी लावली होती. मोदींच्या धोरणांवर ते सातत्याने टीका करत होते. पक्षातून सिन्हांची भाजपाने हकालपट्टी केली नाही. पण त्यांच्याजागी रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली. दुःखी अंतःकरणाने पक्ष सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपाच्या स्थापना दिवशीच त्यांनी भाजपाला रामराम केला आहे. 

आज काँग्रेस कार्यालयात के.सी वेणुगोपाल, शक्ति सिंह गोहिल, रणदीप सुरजेवाला, बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा, अखिलेख सिंह यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे स्वागत केले. काँग्रेस पक्षात सामील होण्याआधी शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटवरून जड अंत:करणाने भाजप पक्षातून बाहेर पडत असल्याचे ट्विट करत म्हटले आहे.

याआधी शक्ति सिंह गोहिल यांनी ट्विट करत, 'मी मनापासून मानतो की, जे विश्वास ठेवणारे आणि अंत:करणातून बोलणारे लोक आहेत, ते कुठल्याही दबावाखाली राहू शकत नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाशी जोडले जाऊन येणाऱ्या आगामी निवडणूकांच्या दिवसांत पक्षाचे प्रचारक म्हणून एकत्र काम करणार असल्याचे' सांगितले आहे.