मुंबई : युक्रेन आणि रशिया या देशांमधील तणाव वाढल्याने, जगातील अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली. जगभरातील बाजार कोसळल्याने भारतीय बाजारांमध्येही देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही विक्रीचा सपाटा लावला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच सेंन्सेक्स उघडताच 1500 अंकांनी घसरला होता तर, बाजार बंद होताना बाजार तब्बल 1700 हून अधिक अंकानी कोसळला. एनएससी निर्देशांक निफ्टी देखील तब्बल 500 अंकाहून जास्त अंकांनी घसरला.
बाजारा बंद झाला तेव्हा सेंन्सेक्स 56405 अंकांवर तर निफ्टी 16,842 अंकांवर बंद झाले. दोन्ही निर्देशांकांमध्ये ही दिवसाची तसेच या वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीदेखील बाजारात काहीशी घसरण नोंदवली गेली होती. त्याचवेळी बाजारात मोठ्या घसरणीचे संकेत मिळत होते. अमेरिकेतील शेअर बाजार व्याजदर वाढीमुळे तसेच युक्रेन - रशियाच्या वाढत्या तणावामुळे घसरणीसह बंद झाले,
युक्रेन-रशियाच्या तणावामुळे कच्च्या तेलाची किंमत 7 वर्षांच्या उच्च स्तरावर पोहचल्या आहेत. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅऱेलच्या स्तराला पार करू शकतात. जर असे झाले तर जागतिक अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम दिसून येईल. यासोबतच देशांतर्गत अर्थकारणात खळबळ उडवणारा एबीजी शिपयार्डचा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून येत आहे.