बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद यादव यांची जेडीयूमध्ये वापसीची शक्यता

विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांचा पक्ष मजबूत करण्यावर भर

शैलेश मुसळे | Updated: Sep 1, 2020, 08:48 AM IST
बिहार विधानसभा निवडणुकीआधी शरद यादव यांची जेडीयूमध्ये वापसीची शक्यता title=

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला मजबूत करण्यासाठी नितीश कुमार प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत नितीशचे जुने सारथी असलेले माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांची घरवापसीची शक्यता वाढली आहे. शरद यादव यांना जेडीयूमध्ये परत आणण्यासाठी पक्षाचे अनेक नेते त्यांच्याशी संपर्कात आहेत.

नितीशकुमारांशी राजकीय वादामुळे शरद यादव यांनी २०१८ मध्ये जेडीयूमधून बंडखोरी केली आणि लोकतंत्र जनता दल नावाचा आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला. शरद यादव यांच्यासोबत अली अन्वर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला. यानंतर शरद यादव यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मधेपुरा येथून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण जेडीयूचे दिनेश्वर यादव यांनी त्यांचा १ लाख मतांनी पराभव केला.

गेल्या काही दिवसांपासून शरद यादव यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शरद यादव यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी जेडीयूच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांना संपर्क साधला. यावेळी, पक्षात त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शरद यादव विधानसभा निवडणुकीपूर्वी जेडीयूमध्ये येऊ शकतात.

शरद यादव सध्या महाआघाडीचे भाग असले तरी आरजेडीकडून त्यांचे विशेष महत्त्व दिले जात नाही. यावर शरद यादव देखील नाराज आहेत. अशा परिस्थितीत शरद यादव यांच्या जेडीयूमध्ये परत जाण्याची शक्यता वाढली आहे.

शरद यादव यांच्या जेडीयूमध्ये थेट प्रवेशाबाबत जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन थेट काही बोलत नाहीत, पण त्यांचे हावभाव तेच संकेत दर्शवतात. ते म्हणाले की, शरद यादव हे समाजवादी चळवळीतील एक मोठे नेते आहेत, परंतु अधिकृतपणे आमच्याकडे सध्या त्यांना पक्षात घेण्याबाबत काही माहिती नाही. शरद यादव यांची महाआघाडीत कोंडी होत आहे. हे नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत त्यांनी निर्णय घेतल्यास त्यांना धक्का बसणार नाही.

वास्तविक, नितीशकुमार हे आरजेडीच्या पारंपारिक मतदारांवर लक्ष ठेवून आहेत. हे लक्षात घेता यादव व मुस्लीम आमदारांसह जेडीयूमध्ये अनेक आरजेडी नेत्यांची एंट्री झाली आहे. शरद यादव हे लालूंचे पारंपरिक मतदार असलेले यादव व्होट बँक घेऊ शकतात. त्यामुळे जेडीयू त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.