Sexual Harassment Of Minor : अल्पवयीन मुलांसमोर शारीरिक संबंध ठेवणं किंवा विवस्त्र होत त्यांच्यापुढं अंगप्रदर्शन करणं हा लैंगिक अत्याचाराचाच प्रकार असल्याचं निरीक्षण केरळ उच्च न्यायालयानं नोंदवलं. पोक्सो कायद्याअंतर्गत वरील कृती दंडनीय अपराध असल्याचंही न्यायालयानं अधोरेखित केलं. न्यायमूर्ती ए बदरुद्दीन यांनी एका महत्त्वाच्या याचिकेवरील सुनावणीवेळी हा निकाल दिला.
भारतीय दंडसंहिता, पॉक्सो कायदा आणि किशोर न्याय अधिनियमाअंतर्गत विविध गुन्हांवरील तक्रारी आणि प्रकरणं रद्दबातल करणाऱ्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला. सदर प्रकरणात एका व्यक्तीवर आरोप करण्यात आले होते की, त्यानं खोलीचं दार न लावता एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलाच्या आईशी शारीरिक संबंध ठेवले. ज्यानंतर हे कृत्य पाहणाऱ्या त्या लहान मुलानं या साऱ्याबाबत प्रश्न विचारताच या व्यक्तीनं त्याला मारहाण केली.
आरोपी- याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार आपल्याविरोधात कोणत्याही गुन्हाची नोंद होऊ नये असं म्हटलं गेलं. याच अतिशय संवेदनशील मुद्द्यावर निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं मांडलेल्या भूमिकेनुसार कोणाही व्यक्तीकडून एखाद्या लहान मुलाला विवस्त्र शरीर दाखवल्यास ते कृत्य मुलाच्या लैंगिक शोषणहेतू केलं गेलेलं कृत्य ठरतं. ज्यासाठी पॉक्सेच्या 11 (I) (लैंगिक शोषण), कलम 12 (लैंगिक शोषण प्रकरणी दंड) अंतर्गत दंडनीय गुन्ह्याची नोंद केली जाते.
न्यायालयानं नोंदवलेल्या मतानुसार आरोपींनी विवस्त्र असतानाही खोलीचं दार न लावता शरीरसंबंध ठेवले आणि लहान मुलाला खोलीत प्रवेश तरु दिला, ज्यानंतर त्या मुलानं ही कृत्य पाहिली. परिणामी प्रथमदर्शनी ही कृती दंडनीय गुन्ह्यास पात्र आहे. सदरील आरोपीनं लहान मुलाला मारहाण केली आणि मुलाच्या आईनं त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही यासाठी त्याच्याविरोधात कलम 323 (जाणीवपूर्वक इजा पोहोचवणं) आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणावर केरळ उच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालाची बरीच चर्चा झाली असून, त्यातून समाजात एक संदेशही दिला गेला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.