सात-आठ दिवस आंघोळच नाही करायचा पती, पत्नीने मागितला घटस्फोट

पीडित महिलेचा पती सात-आठ दिवस आंघोळ तसेच दाढीही करत नसे.

Updated: Apr 13, 2019, 09:20 AM IST
सात-आठ दिवस आंघोळच नाही करायचा पती, पत्नीने मागितला घटस्फोट title=

भोपाळ : पत्नीकडून क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पत्नी 10 मिनिटे उशिरा आली, न सांगता प्रचाराला गेली अशी कारणे सांगत पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. पण भोपाळमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. नवऱ्याच्या सवयीला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. यामागचे कारणही तसेच आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा प्रकार समोर आला आहे. 

पीडित महिलेचा पती सात-आठ दिवस आंघोळ तसेच दाढीही करत नसे. वारंवार समजावूनही त्याच्या सवयीत बदल होत नव्हता. यामुळे कंटाळलेल्या महिलेने कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढली आहे आणि घटस्फोटाची मागणी केली आहे. 25 वर्षाचा तरुण आणि 23 वर्षाची तरुणी यांचे साधारण वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे. दोघांच्या संमतीनंतर त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितले. तलाक हवा असल्यास दोघांना सहा महिने एकमेकांपासून दूर राहावे लागेल असे न्यायाधिश आर.एन.चंद यांनी सांगितले. 

आंघोळ न केल्याने पतीच्या शरीराचा दुर्गंध येतो आणि आंघोळ करण्यास सांगितल्यावर तो कपड्यांवर अत्तर लावतो अशी तक्रार असल्याचे न्यायाधिश शैल अवस्थी यांनी सांगितले. हे एक महिन्यपुर्वीचे प्रकरण आहे. हिंदु विवाह अधिनियम 13 बी परस्पर सहमतीतून विवाह बंधनातून मुक्त अंतर्गत कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल झाली. सहा महिन्यांनंतर हा घटस्फोट कायदेशीर होणार आहे. 

हा आंतरधर्मीय विवाह होता आणि ठरवून दिलेले लग्न होते. एक वर्षांपासून हे दाम्पत्य एकत्र राहत होते. मुलगा सिंधी समाजाचा तर मुलगी ब्राम्हण समाजातील आहे. यांना मुलं नाही आहेत. बैरागढमध्ये तो दुकान चालवतो. लग्नानंतर सिंधी समाजात तिने मिसळून जाण्याचा प्रयत्न तर केला पण ते तिला जमलेच नाही. पती घरातील सामान व्यवस्थित ठेवत नाही असा पत्नीचा आरोप आहे. पती भविष्यासाठी पैसे वाचवून ठेवत नसल्याचेही तिने सांगितले.