'मोटार व्हेईकल ऍक्ट'नंतर अपघातांची संख्या घटली, गडकरींचा दावा

देशात १ सप्टेंबर २०१९ पासून नवा 'मोटार व्हेईकल ऍक्ट' लागू करण्यात आला.

Updated: Nov 23, 2019, 07:41 AM IST
'मोटार व्हेईकल ऍक्ट'नंतर अपघातांची संख्या घटली, गडकरींचा दावा title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात १ सप्टेंबर २०१९ पासून नवा 'मोटार व्हेईकल ऍक्ट' लागू करण्यात आला. 'मोटार व्हेईकल ऍक्ट' लागू झाल्यानंतर चलानमध्ये कमी झाल्याची बाब समोर आली होती. परंतु आता या नव्या कायद्यामुळे गंभीर अपघात कमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी, वेग-वेगळ्या राज्यात गंभीर अपघात होण्याचं प्रमाण कमी झाल्याचं सांगितलं. देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि सरकार अनेक दशकांपासून प्रयत्न करत होते, मात्र आता याचा काहीसा परिणाम दिसत असल्याचं ते म्हणाले.

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर आणि यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक परिणाम चंदीगडमध्ये दिसून आला. चंदीगडमध्ये गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये ७५ टक्क्यांची कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, पदुचेरीमध्ये ३०.७ टक्के, तर उत्तराखंडमध्ये २१ टक्के आणि गुजरातमध्ये १३.८ टक्क्यांनी अपघाताच्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये गंभीर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा आकडा ४ टक्के इतका आहे.

रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यासाठी देशात 'मोटार व्हेईकल ऍक्ट' लागू करण्यात आला. हा कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक नियम तोडणाऱ्यांना १० टक्के अधिक चलान भरावे लागले आहे. हा कायदा लागू केल्यानंतर देशातील अपघातांची संख्या कमी झाल्याचा दावा नितिन गडकरी यांनी संसदेत केला आहे.