ममता बॅनर्जींसोबत लंडनला गेलेल्या पत्रकारांनी चोरले चांदीचे चमचे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर काही पत्रकार लंडन दौऱ्याला गेले होते.

Updated: Jan 10, 2018, 09:15 PM IST
ममता बॅनर्जींसोबत लंडनला गेलेल्या पत्रकारांनी चोरले चांदीचे चमचे  title=

लंडन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर काही पत्रकार लंडन दौऱ्याला गेले होते. ममतांबरोबर गेलेले हे सगळे वरिष्ठ पत्रकार एका लक्झरी हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये असलेले चांदीचे चमचे पत्रकारांनी चोरले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. चोरी करणाऱ्या पत्रकारांमध्ये बंगालमधील एका सन्मानित वृत्तपत्राचा पत्रकार तर एका संपादकाचंही नाव आहे. हा संपादक ममता बॅनर्जींसोबत नेहमी परदेश दौऱ्यावर जातो.

आऊटलूकनं छापलेल्या बातमीनुसार लंडनमधल्या एका शानदार हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जेवणानंतर पत्रकारांनी चांदीचे चमचे चोरून बॅगमध्ये टाकले. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार समोर आला आहे.

सुरुवातीला हॉटेल स्टाफनं याकडे दुर्लक्ष केलं पण काही वेळानंतर पत्रकारांना हॉटेलमध्ये सीसीटीव्ही आहेत आणि या सगळ्याचं रेकॉर्डिंग झालं असल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा पत्रकारांनी चमचे टेबलवर ठेवले.

एका पत्रकारानं मात्र आपण अशी कोणतीही चोरी केली नसल्याचं सांगत स्वत:ची तपासणी करायला सांगितलं. हॉटेल स्टाफनं पोलिसांना बोलवण्याचा इशारा दिल्यानंतर पत्रकारांनं चोरी केल्याचं मान्य केलं. या सगळ्या प्रकारानंतर पत्रकारांना ५० पाऊंड्स दंडही भरावा लागला आहे.