अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या 14 विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा

 50 हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Updated: Feb 14, 2019, 12:04 PM IST
अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या 14 विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा title=

नवी दिल्ली : अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटी पुन्हा एकदा वादात घेरली गेली आहे. इथे देशविरोधी नारे दिल्याच्या आरोपाखाली 14 विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी हे प्रकरण नियंत्रणाच्या बाहेर गेले. त्यानंतर इथली इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आली. देशविरोधी घोषणा सुरू झाल्याच्या वादानंतर एएमयू परिसराला पोलिसांनी घेरले. पोलिसांव्यतिरिक्त इथे पॅरामिलेट्री फोर्सची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. इथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार 50 हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

ज्या 14 विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला आहे, त्यातील एक विद्यार्थी मशकूरचे म्हणणे आहे की, तो घटनेवेळी दिल्लीमध्ये होता. जामिया मिल्लिया आंदोलनाच्या समर्थनार्थ मी दिल्लीत होतो असे त्याने सांगितले. भाजपाशी माझे जुने वैर असल्याने माझे नाव एफआयआरमध्ये असल्याचे त्याने सांगितले.

पाक समर्थनार्थ नारे ? 

एएमयूचे काही विद्यार्थी पाकिस्तान समर्थनार्थ नारे लावल्याचा आरोप करण्यात येतोय.  एएमयू विद्यार्थी संघाने मंगळवारी समाज विज्ञान विभागाच्या कॉन्फरंस हॉलमध्ये राजकीय नेत्यांची बैठक होणार होती. या कार्यक्रमात एमआयएम नेता असुदुद्दीन ओवैसी यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. पण ओवैसी यांना आमंत्रण दिल्याने हिंदू संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. यानंतर बाचाबाची झाली आणि काहींनी देशविरोधी नारे दिल्याचा आरोप करण्यात आला.

मीडियाशी बाचाबाची

एएमयूत सुरू असलेल्या वादापूर्वी एका खासगी वृत्तवाहीनीच्या पत्रकारांसोबतही सुरक्षा रक्षकांची बाचाबाची झाली. या कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकारांना सुरक्षा रक्षकांनी विरोध केला.