मुंबई : एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने किरकोळ कर्ज घेणा-या ग्राहकांसाठी एक खास सूट आणली आहे. एसबीआयने आपल्या विविध प्रकारच्या किरकोळ कर्जांवरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली आहे.
ही कर्जमाफी इतर बँकांच्या गृहकर्जाला टेकओव्हर केल्यानंतर मिळणाऱ्या सुटीव्यतिरिक्त असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही एसबीआयमधून कार, पर्सनल गोल्ड लोन आणि पर्सनल लोक घेणार असाल तर ही सुखद बातमी आहे
कार लोन, पर्सनल गोल्ड लोन आणि इतर पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येईल असे बँकेने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जे ग्राहक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कार लोनसाठी अर्ज करतील, अशांची कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ केली जाणार आहे.
या व्यतिरिक्त बँकेने ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंतच्या पर्सनल गोल्ड लोनच्या प्रोसेसिंग फीवर ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ग्राहक एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये ५० टक्क्यांपर्यंतची सूट मिळवू शकतात.