SBI खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी; तुमच्या खात्यातील पैसे...

SBI Cyber ​​VaultEdge insurance plan : भारतीय स्टेट बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? तर, ही बातमी तुमच्यासाठी. कारण, खात्यात असणाऱ्या तुमच्या पैशांसाठी बँकेकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Updated: Jul 6, 2022, 02:40 PM IST
SBI खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी; तुमच्या खात्यातील पैसे... title=

SBI Cyber ​​VaultEdge insurance plan : SBI ही नेहमी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या योजना लाँच करत असते. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये होणाऱ्या नवनवीन बदलांमुळे सर्व प्रकारचे व्यवहार सोपे झाले आहेत. अस असलं तरी सायबर क्राईममधेही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमुळे SBI ने 'सायबर वॉल्ट एज इन्शुरन्स प्लॅन' सुरू केला आहे. SBI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा प्लॅन तुम्हाला सायबर धमक्या आणि हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी मदत करेल.

सायबर गुन्ह्यांना संरक्षण मिळणार!

सीईआरटी-इन डेटानुसार, 2021 मध्ये सायबर सुरक्षेतील त्रुटींच्या घटनांमध्ये 14.02 लाखांपर्यंत वाढ झाली आहे. अशाच त्रुटींची संख्या 2018 मध्ये 2.08 लाख होती. बँकांनी (खाजगी आणि सार्वजनिक) प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार, सायबर गुन्हे, एटीएम/डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग यांच्या मार्फत फसवणूक झाल्यामुळे 2020-21 मध्ये 63.4 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत एसबीआयचा हा प्लॅन खातेधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

योजनेत नेमकं काय असणार आहे?

सदर योजनेअंतर्गत बँकेने ग्राहकांना सायबर क्राईम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वैयक्तिक माहितीची चोरी आणि फसव्या व्यवहारांपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने SBI General Cyber ​​VaultEdge ही नवी कार्यप्रणाली वापरात आणली आहे.

SBI ची ही नवीन योजना सायबर गुन्ह्यांपासून आणि इंटरनेटवरील कोणत्याही डिजिटल व्यवहारादरम्यान ग्राहकांना संरक्षण देणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत ई-व्यवहार, ओळख दाखवण्यासंदर्भातील चोरी, सोशल मीडिया ट्रोलिंग, गुंडगिरी आणि पाठलाग यासह इतर ऑनलाइन गुन्ह्यांचा समावेश आहे.

कायदेशीर खर्च देखील कव्हर केला जाईल

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे किंवा त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा खर्चही केला जाणार आहे. याशिवाय, आयटी तज्ज्ञांकडून देण्यात येणाऱ्या सेवांचा फायदा घेऊन डेटा रीस्टोर करण्यासाठी लागणारा खर्चदेखील या योजनेत समाविष्ट केला जाणार आहे. एवढंच नाही तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा कोणत्याही घटनेनंतर पीडित व्यक्तीला मानसिक आघात झाला, तर मनसोपचार तज्ज्ञाचा खर्चदेखील याच योजनेअंतर्गत केला जाईल.