संजय राऊत : 'आम्ही भाजप नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाणार नाहीत'

आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.

Updated: Feb 9, 2022, 10:19 AM IST
संजय राऊत : 'आम्ही भाजप नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाणार नाहीत' title=

नवी दिल्ली : EDकडून शिवसेना नेत्यांना (Shiv Sena leader) जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही. मी ईडी कार्यालयाबरोबर पत्रकार परिषद घेणार आहे, असे ते म्हणाले. (Sanjay Raut's serious warning to BJP)

ठाकरे सरकार पाडण्यासाठी मोठा दबाव - संजय राऊत

शिवसेना नेते आणि त्यांचे नातेवाईक यांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केले जात आहे, अशी तक्रार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राऊत यांनी पत्र लिहून ही तक्रार केली आहे. एवढंच नाही तर माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे पुढील अनेक वर्ष तुरूंगात जाल, अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचा दावाही या पत्रात राऊत यांनी केला आहे. आपल्याविरोधात साक्ष देण्यासाठी 28 जणांना ताब्यात घेऊन यंत्रणांकडून धमकावले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

माझं पत्र ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाला बदनाम करायचं चालले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी ईडीचे लोक पाच दिवस जाऊन बसले. ईडी म्हणते की या नेत्याचं नाव घ्या त्या नेत्याचं नाव घ्या. महाविकास आघाडीतील सर्वजण एकत्र आहोत. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. केंद्रीय यंत्रणा विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं, असे ते म्हणाले.

माझ्या मुलीच्या लग्नात ज्यानं फुले दिली त्यांची चौकशी ईडी करत आहे. हे काय ईडीचे काम आहे का ? त्या फुलवाल्याने सांगितले की, या घराण्याशी माझे संबंध आहेत. म्हणून मोफत फुलं दिली, अशी माहिती त्यांनी दिली.