मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या मुलाचा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा रॅप चांगलाच व्हायरल होत आहे. सांगा शेती करू कशी? पोटाची खळगी भरू कशी? असा प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळका धानोरा या गावचा रॅपर अजित शेळके हा विचारत आहे. ज्यात त्याने शेतकऱ्यांसमोर कशाप्रकारे समस्या येतात ते मांडलं आहे. त्यामुळे राज्यात त्याला आणि त्याच्या रॅपला प्रचंड पसंती मिळत आहे.
अजित हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शेळका धानोरा या गावचा आहे. तीन बहिणी एक भाऊ, जेमतेम पाच एक्कर शेती असा त्याचा प्रपंच आहे. आणि त्या शेतीवर काबाडकष्ट करून, सावकाराकडून कर्ज घेऊन त्याच्या आई-वडिलांनी मुलींचे लग्न केले. आता ते आपल्या दोन्ही मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण देत आहेत. हे सर्व करत असताना शेतकऱ्यांना किती हाल अपेष्ठा सोसाव्या लागतात हे अजितने त्याच्या रॅपसॉंगमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
बार्शी येथील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अजित अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. शिक्षण घेत असताना त्याला कविता करणे गाणे, लिहणे याचा छंद आहे. त्यातच त्याने युट्युबवर पाहून रॅप गाणी लिहायला शिकला. आपल्या युट्युब अकाउंटवर त्याने आत्तापर्यंत 5 रॅप गाणी बनवून अपलोड केली मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सांगा शेती करू कशी? या रॅपने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मला शेतकऱ्यांची व्यथा माहिती आहे, शेतकरी कशाप्रकारे शेतात राबतो हे मी जवळून पाहिलं आहे. म्हणून माझ्या रॅपमध्ये मी ते चांगल्या प्रकारे मांडू शकलो असं अजित म्हणतो.
अक्षय शिंदे, दत्ता पाटील, चेतन गरुड प्रोडक्शन यांनी मला रॅप बनवायला मदत केली. सुरवातीला आई वडिलांना आपण शिक्षण सोडून काहीतरी वेगळंच करतोय, असं वाटू लागलं होतं. मात्र माझा हा रॅप पाहून तेही भावुक झाले, अशी प्रतिक्रिया अजितने 'झी 24 तास'शी बोलताना दिली. अभिनेता रणवीर सिंहचा गली बॉय नुकतंच प्रदर्शित झाला. त्यात एका झोपडपट्टीतील मुलगा रॅप गाणी गाऊन देशभरात प्रसिद्धी मिळवतो. मात्र या गावाकडच्या बॉयने रॅपच्या माध्यमाने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून सर्वांची मनं जिंकली आहे.