नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे मित्र सचिन पायलट यांनी मौन सोडलं आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री असलेल्या सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्यचं काँग्रेस सोडणं दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षातंर्गत हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, असं सचिन पायलट म्हणाले.
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मुख्यालयात अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत सिंदिया भाजपमध्ये दाखल झाले. मंगळवारी सिंदिया यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या बैठकीनंतर ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपावला. भाजपमध्ये दाखल होताच ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. मध्य प्रदेशमधल्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झालं आहे. ज्योतिरादित्य सिंधियांच्या या बंडामुळे मध्य प्रदेशामध्ये पुन्हा भाजपचं सरकार येण्याची शक्यता बळावली आहे.
काँग्रेसकडून जनतेला दिलेली अनेक आश्वासनं पाळली गेली नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन कागदोपत्रीच असल्याचं सांगत तरुण पिढीत रोजगाराच्यागी संधी नसल्याचं वास्तव त्यांनी सर्वांपुढे ठेवत रोजगाराला संधी नसली तरीही भ्रष्टाचाराला मात्र पक्षात वाव आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, जनसेवेसाठीच आपण प्रयत्नशील असू, अशी भावना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली.