Bangladesh Crisis : बांगलादेशात अराजकतेचा फायदा घेत सध्या अनेक ठिकाणी हिंदूंना टार्गेट करण्यात येतंय. बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षेची (Security of Hindus in Bangladesh) चिंता सगळ्यांनाच सतावत आहे. केंद्र सरकारनं बांगलादेशातील परिस्थितीवरून सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही बोलावली होती. मात्र, या बैठकीत बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेवर केंद्राची भूमिका नक्की काय आहे ? हिंदूच्या सुरक्षेसाठी भारत सरकार काय करणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. रशिया-युद्ध थांबवणाऱ्यांनी आता बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले थांबवावेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींना (PM Modi) लगावलाय.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बांगलादेशातील हिंसक सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावलाय. पापा युक्रेन-रशियाचं वॉर थांबवू शकतात, मग बांगलादेशातील वॉर थांबवा असं पापांना सांगा, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावलाय. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायत ते थांबवा असं पापांना सांगा, असंही ठाकरे म्हणाले.
रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांना युद्ध थांबवून सुरक्षित भारतात परत आणलं अशा आशयाची जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रसारित केली होती. सोशल मीडियावर या जाहिरातीवरून ट्रोल करण्यात आलं. विरोधकांनीही या जाहिरातीवरून मोदींवर टीका केली होती. बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले होत आहेत.सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्यानं बांगलादेशच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याचीही मागणीही उद्धव यांनी केलीय.
धारावीच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे आक्रमक
धारावीच्या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. धारावीच्या विकासाला माझा विरोध नाही. धारावीतल्या नागरिकांना धारावीतच घर मिळालं पाहिजे, टेंडरच्या अटीशर्थी अदानींना जमत नसतील तर नवीन टेंडर काढण्याची सल्ला ठाकरेंनी केलीय. अदानी माझे शत्रू नाहीत, जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. अदानींना जमत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करावं. धारावीकरांना धारावीतच घर मिळावं. आम्ही विकासाच्या आड नाही आणि पवारही मुंबईची वाट लावायला देतील वाटत नाही असं ठाकरेंनी म्हटलंय.
सध्या जगभरात अनेक देशांतील नागरिक रस्त्यावर उतरले. भारतातही मणिपूर आणि काश्मिरमध्ये अशांत परिस्थिती आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान मोदींनी कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. नेत्यांनी सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जनतेला वेठीस धरल्यास जनतेचे न्यायालय काय करू शकते ? हे बांगलादेशच्या घटनेनं दाखवून दिल्याचं सांगून ठाकरे यांना मोंदीवरही अप्रत्यक्ष टीका केलीय.