मुंबई : टीआरपी घोटाळ्या प्रकरणी ‘रिपब्लिक’वाहिनीसमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या याप्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एका आरोपीने ‘रिपब्लिक’वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी दरमहा १५ लाख रूपये मिळत असल्याचे कबुल केले. अभिषेक कोळावडे असं या आरोपीचं नाव आहे. कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै हे सात महिने आरोपीला दरमहा १५ लाख रूपये मिळत होते. म्हणजे दरमहा १५ लाख रूपये प्रमाणे मिळणारी रक्कम १ कोटी रूपयांच्या घरात आहे. वरील गोष्टीची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली आहे.
त्याचप्रमाणे यातील काही रक्कम वितरक असलेल्या आशीष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली असून उर्वरित रक्कम हवाला माध्यमातून आल्याचे त्याने म्हटले आहे. आशी माहिती मिळताच पोलिसांनी चौधरीच्या घराची आणि ऑफिसची झडती घेतली. यामध्ये ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेक याच्या घरातून दोन लाख रुपये तर, अशीष याच्या कंपनी कार्यालयातून हस्तगत करण्यात आले.
दरम्यान, मॅक्स मीडिया चालवणाऱ्या अभिषेक कोळावडेने चौकशीमध्ये आशीष चौधरीचं नाव घेतल्याने २८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस अद्यापही चौकशी करत आहेत. याशिवाय याप्रकपरणी अन्य आरोपी रमजी वर्मा, दिनेश विश्वकर्मा आणि उमेश मिश्रा यांची देखील नावे समोर आली आहेत.