श्रीगंगानगर : आतापर्यंत पैशांची बँक, सोन्या-चांदीची बँक पाहिली असेल, पण कधी 'रोटी बँक' पाहिली आहे का? (Roti Bank) श्रीगंगानगरमध्ये कोडा चौकाजवळ एक अशी बँक चालवली जाते, ज्यात भुकेल्या लोकांसाठी चपात्या एकत्र केल्या जातात. त्यानंतर त्या गरीब आणि गरजू लोकांना खाण्यासाठी दिल्या जातात.
गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या बँकेचा उद्देश, कोणताही व्यक्ती उपाशी पोटी झोपू नये हाच आहे. या बँकेची वेळ दुपारी १२ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत असते. या बँकेत कोणीही येऊन चपाती जमा करु शकतं आणि कोणीही येऊन खाऊ शकतं.
'रोटी बँक'चे संचालक सोनू अनेजा यांनी सांगितलं की, 'रोटी बँक'ची सुरुवात मजूरांना पाहून सुरु झाली. कोडा चौकात रोज सकाळी मजूर एकत्र जमतात. ज्या मजूरांना काहीच काम मिळत नाही ते भुकेल्या पोटी आपल्या घरी निघून जातात. याच मजूरांसाठी त्यांनी आपल्या चार मित्रांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी घरातून डब्बे आणण्यास सुरुवात केली. सुरुवातील १० ते १५ डब्बे आणले जात होते. पण आता हळू-हळू डब्ब्यांची संख्या ३५० पर्यंत पोहचली आहे.
'रोटी बँक'जवळच एक ढाबादेखील आहे. ढाबा मालकही दररोज 'रोटी बँक'मध्ये नि:शुल्क जेवण देण्याची सेवा करतात. नि:शुल्क सेवा करण्याने व्यवसायात नुकसान होत नाही का? या प्रश्नावर ढाबा मालकाने त्यांना कोणतंही नुकसान होत नसल्याचं सांगितलं. याउलट व्यवसायात फायदा होतो आहे. गरजू लोकांना जेवण देण्यामुळे चांगले आशिर्वाद मिळत असून व्यवसायात वाढ होत असल्याचं ढाबा मालक यांनी सांगितलं.
'भूके'चा कोणताही धर्म नाही. भुकेल्या व्यक्तीला जेवण मिळालं, तर त्याला दुसरा आनंद नाही. देशात असे लाखो लोक आहेत ज्यांना एक वेळेचं जेवण मिळणंही मुश्किल आहे. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे, जेवणातील मोठा भाग कचऱ्यात फेकून देतात. त्यामुळे भुकेल्यांना जेवण मिळावं यासाठी शहरातील तरुणांद्वारा लग्न, वाढदिवस, इतर कार्यक्रमात शिल्लक राहिलेलं जेवण कचऱ्यात, रस्त्यांवर न फेकण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उरलेलं जेवण 'रोटी बँक'मध्ये देण्याचं सांगण्यात येतं.