सोन्याच्या किंमतीत घसरण; काय आहे आजचा दर?

सोन्याच्या किंमतीत घसरण

Updated: Dec 11, 2019, 04:04 PM IST
सोन्याच्या किंमतीत घसरण; काय आहे आजचा दर? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. बुधवारी सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मजबुतीमुळे मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ०.०५ टक्क्यांनी घसरून ३७, ५५१ रुपयांवर पोहचला.

गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या किंमतीत ८०० रुपये प्रति ग्रॅमच्या घसरणीची नोंद करण्यात आली आहे. एकून गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या किंमतीत २,४५० रुपये प्रतिग्रॅमची घसरण झाली आहे. 

सराफा बाजारात १० किलो चांदीचा दर ०.०९ टक्क्यांच्या घसरणीसह ४३ हजार ४६९ रुपयांवर पोहचला आहे.  

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं की, १५ डिसेंबरपूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार-कराराच्या अपेक्षेमुळे सोन्याची विक्री झाली आहे. १५ डिसेंबर ही अमेरिकेसाठी नवीन मुदत आहे. अमेरिकेमध्ये, नोव्हेंबर महिन्यात रोजगाराचे आकडे अपेक्षेहून अधिक चांगले आल्यानंतर, महागड्या धातुंच्या किंमतीत घसरण झाल्याची माहिती मिळत आहे. 

परदेशी बाजारात आलेल्या घसरणीच्या संकेतांमुळे, देशांतर्गत वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत एक टक्का आणि चांदीच्या किंमतीत दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. चांदीच्या किंमतीत एक हजार रुपये प्रतिकिलोहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली होती.

फेब्रुवारी २०२०च्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात वायदे बाजारात (Commodity Market) सोन्याच्या किंमतीत गेल्या सत्राहून ३७९ रुपये म्हणजे एक टक्क्याची घसरण होत, सोन्याचा दर ३७ हजार ७०६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. तर यापूर्वी फेब्रुवारी २०२०च्या आधीच्या सत्रात सोन्याचा दर, ३७ हजार ६८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.