मुंबई : आजपासून भारतीय शेअर बाजारात कंपन्यांचे तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर होण्याचा सिलसिला सुरु होतोय. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या निकालांनी रिझल्ट सिजनची सुरुवात होईल. याच निकालांनी बाजाराची पुढची दिशाही ठरण्याची शक्यता आहे.
जागतिक स्तरावरील युद्धस्थितीमुळे कच्च्या मालाचे दर कमालीचे चढले आहेत. त्यामुळे तीन चार महिन्यात जवळपास सगळ्याच कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम कंपन्याच्या नफ्यावर होणे अपेक्षित आहे.
डॉलरच्या तुलनेत पडलेल्या रुपयाचा आयटी कंपन्यांना किती फायदा झाला, जागतिक स्तरावर पोलाद, अल्युमिनिअम, तांबे, निकेल, कच्चे तेल या मूलभूत कच्च्या मालाचा पुरवठा कंपन्यांना भाववाढीचा कितपत फायदा झाला? चढ्या दरांनं मिळणारा कच्चा माल वापरणाऱ्या ऑटो, रसायन, सिमेंट, रंग बनणाऱ्या कंपन्यांचा किती तोटा झाला आहे.
या सगळ्यावर बाजाराची बारीक नजर असेल. शिवाय भविष्यातील वाढीव व्याजदरांचा नफ्यावर किती परिणाम अपेक्षित आहे हे सुद्धा कंपन्यांच्या निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे शेअर बाजारात पुढचा महिनभार वेगवान चढउतार अपेक्षित आहेत.
-
केंद्रीय अर्थमंत्रालयानं LICचा IPO 12 मे रोजी बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवल्याची माहिती 'झी मीडिया'च्या सूत्रांनी दिली. युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात आयपीओ बाजारात आणण्याचे प्रयत्न फसले होते. आता युद्धस्थिती रशिया युक्रेनपुरतीच मर्यादित झाल्यानं बाजारही स्थिरावले आहेत
त्यामुळे आयपीओ आणण्याच्या तयारीला पुन्हा एकदा वेग आला आहे. आज किंवा उद्या SEBI नव्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजूरी देण्याची शक्यता आहे.
एलआयसीच्या आयपीओच्या माध्यमातून सरकारला साधारण 70 ते 80 हजार कोटी रुपये उभारायचे आहेत. त्यासाठी मे महिन्यात बाजाराची स्थिती अनूकुल असेल असा सरकारचा कयास आहे त्यामुळेच 12 मे रोजी आयपीओ बाजारात गुंतवणूदांरासाठी खुला करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.