नवी दिल्ली : आम आदमी पार्टीनं 62 जागा जिंकत दिल्लीचं तख्त राखलं. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं आहे. भाजपला दिल्लीत फक्त 8 जागाच जिंकता आल्या. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्विकारत दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी तिवारींना पदावर कायम राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत, दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीत काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शिवाय त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारीही घटली आहे.
दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये अनेक उलथापालथी सुरू असल्याचं दिसतं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी भाजपची बैठक होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत, संध्याकाळी पक्षाच्या महासचिवांची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा या बैठकीला हजर राहणार आहेत.
दरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल १६ फेब्रुवारीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. आपनं ७० पैकी ६२ जागा जिंकून तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबिज केली आहे. भाजपला आठ जागा तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.