RBI : आरबीआयची 'या' 2 मोठ्या बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश

दोन्ही बँकांनी बँकिंग नियमन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं (Rbi) आरबीआयने म्हटलंय.   

Updated: Oct 18, 2022, 06:04 PM IST
RBI : आरबीआयची 'या' 2 मोठ्या बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) दोन सहकारी बँकांना दंड ठोठावला. यापैकी एक पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँक (rajgurunagar sahakari bank) आणि दुसरी गुजरातमधील राजकोट सहकारी बँक (Co-operative Bank of Rajkot) आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेला 4 लाख आणि राजकोटच्या सहकारी बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (reserve bank of india penalty to rajgurunagar sahakari bank and co operative bank of rajkot)

"व्याजदर आणि ठेवीबाबत मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजगुरुनगर सहकारी दोषी आढळून आले आहे. त्याचवेळी राजकोटच्या सहकारी बँकेने जनजागृती योजनेशी संबंधित नियमांची पायमल्ली केली आहे.  त्यामुळे हा दंडात्मक कारवाईचा बडगा उचललाय", अशी माहिती आरबीआयने दिली आहे.  

आरबीआयने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. राजगुरुनगर सहकारी बँकेने मृत खातेदारांच्या चालू खात्यात असलेली रक्कम दावेदारांना सुपूर्द केली नसल्याचे तपास अहवालात उघड झालं. अशा स्थितीत दावेदारांची अडचण होत होती. आरबीआयने यापूर्वी बँकेला नोटीस बजावली होती.  पण आरबीआय बँकेच्या लेखी उत्तरावर समाधानी नव्हते आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेला दंड ठोठावला.

आरबीआयने काय म्हटलं? 

"ही दंडात्मक कारवाई बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 56, कलम 46 (4) आणि कलम 47A (1) (c) अंतर्गत दोषी आढळल्याने बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच आदेशाचा बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर किंवा ग्राहकांवर परिणाम होणार नाही", अशीही माहिती आरबीआयने दिली.