'सुधारणा करा नाहीतर कंपनी सोडा...', 'या' सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद

सतत तोट्यात चाललेल्या सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची गदा?  

Updated: Aug 7, 2022, 11:53 AM IST
'सुधारणा करा नाहीतर कंपनी सोडा...', 'या' सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद  title=

मुंबई : कोणत्याही कंपनी कर्मचाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असते. कारण कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर कंपनीची प्रगती अवलंबून असते. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गावर चालण्याचा विचार केल्याचं भासत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या अधिकार्‍यांशी झालेल्या पहिल्या बैठकीत 'सुधारणा करा नाहीतर कंपनी सोडा...' अशी सक्त ताकीद कर्मचाऱ्यांना दिली आहे. 

'काम करून दाखवा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या, पण सरकारी कंपनीचा ताबा सोडा....' अशी सक्त ताकीद अश्विनी वैष्णव यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे.  त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठं अव्हान उभं आहे. 

दरम्यान, मीटिंगचा एक ऑडिओ लीक झाला आहे, ज्यामध्ये वैष्णव या तोट्यात चाललेल्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीच्या 62 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सत्य परिस्थिती सांगत आहेत. वैष्णव यांनी या आठवड्यात बीएसएनएलला बळ देण्यासाठी 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे.

याशिवाय दर महिन्याला नियमित प्रगतीचे ऑडिट होईल असं स्पष्ट बीएसएनएलसह भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. 'ज्यांना काम करायचं नसेल ते कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी आरामात बसू शकतात. ' असं देखील अश्विनी वैष्णव  बैठकीत म्हणाले. 

एवढं मोठं पॅकेज देऊन सरकारने जे करता येईल ते केलं, असं वैष्णव म्हणाले. जगातील कोणत्याही सरकारने एवढी मोठी जोखीम घेतली नाही जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 लाख 64 हजार कोटींचे पॅकेज देऊन घेतली आहे. 

आता जनतेला सुविधा मिळाव्यात ही आपली जबाबदारी आहे, त्यांमुळे मेहनतीने काम करण्याची गरज आहे. शिवाय येत्या दोन वर्षात उत्तम निकाल हवा असल्याचं देखील अश्विनी वैष्णवय यांनी बैठकीत सांगितलं आहे. 

BSNL आणि BBNL च्या विलीनीकरणामुळे, नवीन उपक्रमाला BSNL ची 6 लाख 83 हजार किमी ऑप्टिकल फायबर केबल व्यतिरिक्त BBNL च्या 5 लाख 68 हजार किमी ऑप्टिकल फायबर केबल मिळत आहे.