पीएमसी बँकेत भाजप खासदाराची 'आयुष्याची कमाई' अडकली

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँकेतल्या घोटाळ्याचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले.

Updated: Feb 3, 2020, 07:42 PM IST
पीएमसी बँकेत भाजप खासदाराची 'आयुष्याची कमाई' अडकली title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँकेतल्या घोटाळ्याचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले. सोमवारी लोकसभेचं कामकाज विरोधकांच्या गोंधळाने चर्चेत राहीलं. परंतु या गोंधळात भाजपचे खासदार रवि किशन यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना पंजाब ऍन्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह  बँक घोटाळ्यासंबंधी खुलासा करत एक सवाल केला. रवि किशन यांनी या बँकेत त्यांची आयुष्यभराची जमापुंजी अडकली असल्याचं सांगितलं. 

महाराष्ट्रात आमचं सरकार होतं, त्यावेळी गेल्या सहा महिन्यात ४० हजार रुपये परत मिळाले, परंतु नवीन सरकार आल्यानंतर बँकेने उत्तर देणं बंद केल्याचं ते म्हणाले. या बँकेत लोकांचे करोडो रुपये अडकले आहेत. त्यामुळे केवळ माझ्यासाठी नाही, तर बँकेत पैसे अडकलेल्या हजारो खातेधारकांना पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकमधून पुन्हा पैसे कधीपासून मिळण्यास सुरुवात होणार, असा सवाल केला.

या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी, हे प्रकरण केंद्र सरकारअंतर्गत येत नसल्याचं सांगितलं. ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकअंतर्गत रजिस्टर्ड आहे, त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारने पावलं उचलायला हवीत असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यासाठी वेळो-वेळी सूट दिली असून, पैसे काढण्याची मर्यादाही वाढवली आहे. ८७ टक्के लोकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत मिळाले आहेत. उर्वरित लोकांसाठी आतापर्यंतच्या निर्णयानुसार, घोटाळ्याशी संबंधित असलेल्यांची मालमत्ता जोडली गेली असून त्यांच्यावर कारवाई सुरु असल्याचं उत्तर अनुराग ठाकुर यांनी दिलं.

पीएमसी (PMC) बँक घोटाळा सप्टेंबर २०१९ मध्ये उघड झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणात ६हून अधिक संबंधितांना अटक करण्यात आली आहे. यात बँकेच्या आताच्या आणि तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एचडीआयएल समूहाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

  

टॉप हेडलाईन्स

भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....

लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर

कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर