नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या साधारण चार दिवसांचा कालावधी लागत आहे. मात्र, दिल्लीच्या मरकजमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रमच झाला नसता तर देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग बराच आटोक्यात असता, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. ते रविवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, दिल्लीच्या मरकजमधील कोरोनाबाधितांचा शोध लागण्यापूर्वी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी साधारण ७.४ दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, मरकजमधील लोकांमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४.१ दिवसांवर आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
कालच मुंबईच्या साकीनाका परिसरात मरकज कनेक्शन असणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर नवी मुंबईमध्येही मरकजमधील कार्यक्रमाला हजेरी लावून परतलेले १० जण एका मशिदीत लपून बसले होते. हे सर्वजण मशिदीत नमाज पढण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये मिसळत होते. त्यामुळे आणखी २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. मरकजहून परतलेल्या एका फिलिपाईन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मरकजमधून परतलेल्या १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ५०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,५७७ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ८३ लोक मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होताना दिसत आहे. कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ६२ जिल्ह्यांमध्ये आढळून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.