Ram Rahim Cuts Cake: 'मी किमान पाच केक कापले पाहिजेत', बलात्काराचा आरोपी राम रहीमचा थाट, व्हिडीओ व्हायरल

बलात्कार आणि हत्येचा आरोपी राम रहीमने पॅरोलवर सुटका झाल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राम रहीम तलवारीने केक कापत असून आपण अजून पाच केक कापले पाहिजे असं म्हणताना दिसत आहे.   

Updated: Jan 24, 2023, 11:03 AM IST
Ram Rahim Cuts Cake: 'मी किमान पाच केक कापले पाहिजेत', बलात्काराचा आरोपी राम रहीमचा थाट, व्हिडीओ व्हायरल title=
पॅरोलवर सुटलेल्या राम रहीमचं केक कापून सेलिब्रेशन

Gurmeet Ram Rahim Cuts Cake with Sword:बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली 20 वर्षांची शिक्षा झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमने (Gurmeet Ram Rahim) केक कापत सेलिब्रेशन केलं आहे. नुकतीच त्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर केला असून यानंतर त्याची हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनरिया जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जेलमधून बाहेर पडल्यानंतर राम रहीने उत्तर प्रदेश गाठलं आहे. दरम्यान मोठा केक कापतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

राम रहीमने आपल्या जामीन अर्जात डेराचे माजी प्रमुख शाह सतनाम सिंग यांच्या जयंती कार्यक्रमासाठी हजर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. 25 जानेवारीला हा जयंती कार्यक्रम होणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत डेराचे प्रमुख म्हणत आहेत की, "पाच वर्षांनी अशाप्रकारे सेलिब्रेशन करण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे मी किमान पाच केक कापले पाहिजेत. हा पहिलाच केक आहे". केक कापताना राम रहीमच्या हातात तलवार आहे. महत्त्वाचं म्हणजे, अशाप्रकारे शस्त्राचं प्रदर्शन करणं कायद्याने गुन्हा आहे. 

राम रहीमने सोमवारी आपल्या स्वयंसेवकांनी हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या मेगा स्वच्छता मोहिमेचे केले. राज्यसभा खासदार कृष्णलाल पनवार आणि माजी मंत्री कृष्ण कुमार बेदी यांच्यासह हरियाणातील भाजपाचे काही वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

गेल्या 14 महिन्यात चार तर तीन महिन्यात दुसऱ्यांदा राम रहीमला पॅरोल मंजूर झाला आहे. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी हरियाणा पंचायत निवडणूक आणि अदमपूर विधानसभा पोटनिवडणूक नियोजित होती. 

आपल्या दोन महिला भक्तांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीमला ऑगस्ट 2017 मध्ये विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं होतं. 2003 मध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करत तपास हाती घेतला होता. राम रहीमने 10 जुलै 2002 मध्ये कुरुक्षेत्रमधील निवासी रणजीत सिंगची हत्या केल्याचाही आरोप होता. 

तपासानंतर सीबीआयने 2007 मध्ये सहा आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली. 2008 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 8 ऑक्टोबर 2021 मध्ये रणजीत सिंग हत्या प्रकरणी कोर्टाने राम रहीम आणि इतर चौघांनी दोषी ठरवलं होतं.