दानवेंचं मंत्रिपद निश्चित, भाजपाचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

भाजप प्रदेशाध्यक्षपदी काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत

Updated: May 30, 2019, 01:28 PM IST
दानवेंचं मंत्रिपद निश्चित, भाजपाचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण? title=

अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी आता राबसाहेब दानवे यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. खासदार रावसाहेब दानवे यांचे केंद्रातील मंत्रिपद नक्की झालंय. तेव्हा एका व्यक्तीला दोन मोठ्या जवाबदारी देणे शक्य नसल्याने राज्यात आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाचे नाव जाहीर होते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्षपदी काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत. अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि सोपवलेली मोहीम हमखास यशस्वी पार पाडणारे मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय आणि संघटनेतील अनेक जवाबदारी पार पाडणारे आमदार संजय कुटे, सुरजितसिंह ठाकूर तसंच मुख्यमंत्री यांचे विश्वासू संभाजी पाटील निलंगेकर अशी नावे यामुळे चर्चेत येत आहेत. एवढंच काय आशिष शेलार यांच्याही नावाची प्रदेशाध्यक्ष म्हणून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

एक मात्र खरं भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोणीही असो तो दिल्लीहून पूर्णपणे मोकळीक दिलेल्या मुख्यमंत्री यांच्या विश्वासातील असेल... त्यांच्या कलाने घेणारा असेल हे नक्की.