पंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 25, 2017, 07:21 PM IST
पंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत title=

पंचकुला : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय. त्याचवेळी मोठा जमाव एकत्र आल्याने तसेच जाळपोळ आणि दगडफेकीमुळे पोलिसांना माघारी फिरावे लागले.

बाबा दोषी ठरल्यानंतर समर्थकांनी थटथयाट करत हरियाणातल्या पंचकुलात मोठ्या प्रमाणावर  जाळपोळ आणि हिंसा केली. सरकारी कार्यालये जाळण्यात आली. बाबा राम रहीम समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. हिंसाचार करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी कूच केली. मात्र जमाव पुन्हा आक्रमक झाल्यानं पोलिसांना माघारी परतावे लागले.

दरम्यान, हरियाणातलं हे हिंसेचं लोण पंजाबमध्ये पसरलंय. पंजाबमधल्या दोन रेल्वे स्टेशन्स पेटवून दिले आहेत. तर अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयांचीही तोडफोड केलीय. अनेक चॅनल्सच्या ओबी व्हॅनही फोडल्या आहेत. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केलाय. तसंच अश्रूधुराचे नळकांडेही फोडले आहेत. मात्र राम रहिमच्या समर्थकांनी अग्नितांडव सुरू केले आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.

या नुकसानीही भरपाई बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाकडून करण्यात यावी, असे आदेश पंजाब-हरियाणा हायकोर्टानं दिले आहेत. हरियाणातील अध्यात्मिक गुरू बाबा राम रहीमला महिलेवरील बलात्कारप्रकरणी सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. या प्रकरणी २८ ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. निकाल दिल्यानंतर बाबाला अटक करण्यात आली. 

त्यानंतर चंडीगडला नेण्यात आलं असून तिथून हेलिकॉप्टरनं रोहतकला नेण्यात आले. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहीमच्या समर्थकांनी कोर्टाच्या बाहेर राडा केला. त्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडण्यात आले.  

सतर्कता म्हणून हरियाणामधल्या अनेक शहरांमधील केबल कनेक्शन तोडण्यात आलं. सुनावणीपूर्वीच पंचकुला सीबीआय कोर्टाच्या परिसराला छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांसह निमलष्करी दलाच्या कुमक मागवण्यात आलेल्या आहेत. 

 पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केले आहे.