चंडीगढ़ : सीबीआय कोर्टाने राम रहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत तुरुंगात धाडले असले तरी त्याची गुर्मी कमी झाल्याचे दिसत नाही. तुरुंगाची हवा खात असलेल्या बाबा राम रहिमची अकड अजूनही कमी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहिमने तुरूंगातील पोलीस अधिका-यांना सस्पेंड करण्याची धमकी दिली आहे. ‘जर माझं म्हणणं ऎकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडून सस्पेंड करवेन’, अशी धमकी त्याने दिल्याचे समजते.
राम रहिमला २५ ऑगस्टला दोषी ठरवल्यानंतर मानलेली मुलगी हनीप्रीत हिच्यासोबत रोहतक तुरुंगात हेलिकॉप्टरने नेण्यात आले. कोर्टात हजर झाल्यावर राम रहिमने हनीप्रीत माझ्यासोबत तुरुंगात राहणार असं पत्र दिलं होतं. तब्येतीचं कारण सांगत त्याने हे पत्र दिलं होतं.
तुरूंगाच्या मॅन्युअलनुसार महिला तुरुंगात राहू शकत नाही. मात्र, तुरूंग प्रशासनाने हनीप्रीतला तब्बल २ तास व्हिआयपी रूममध्ये राम रहिमसोबत राहू दिले. त्यानंतर राम रहिमला रेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आलं. माझ्या कंबरेत दुखत असल्याने कोर्टाने हनीप्रीतला माझ्यासोबत राहण्याची तोंडी परवानगी दिल्याचे त्याने सांगितले.
सूत्रांनुसार राम रहिम हनीप्रीतला रात्री तिथेच ठेवण्याचे म्हणत होता. या गोष्टीला अधिका-यांनी विरोध केला तेव्हा त्याने मुख्यमंत्र्यांना फोन लावून सस्पेंड करण्याची धमकी अधिका-यांना दिली. यादरम्यान हनीप्रीतने चंडीगढ आणि दिल्लीला अनेक कॉल्स केले.
हनीप्रीत ही राम रहिमची मानलेली मुलगी आहे. राम रहिमने तिला २००९ मध्ये दत्तक घेतले होते. स्वत:ला डेरा प्रमुखाची उत्तराधिकारी घोषीत करणा-या हनीप्रीतचं खरं नाव प्रियंका तनेजा आहे.
हनीप्रीतचं लग्न स्वत: राम रहिमने करून दिलं होतं. मात्र, हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ता याने राम रहिमवर पत्नीपासून दूर राहण्याचे सांगितल्याचा आरोप लावला आहे. त्यानंतर हनीप्रीतने विश्वास गुप्ता याच्यावर काही गंभीर आरोप करत ती डेरा मुख्यालयात राहू लागली.